सर्वांनाच आपले पैसे दुप्पट (Double) व्हावेत, असं वाटत असतं. अनेकजण विविध ठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment) करत असतात. कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचे मार्ग शोधले जातात. बाजारात विविध मार्ग आहेत. मात्र हे मार्ग निवडताना विश्वासार्हता, जोखीम, वेळ अशा विविध बाबी तपासल्या पाहिजेत. गुंतवणूक करताना शॉर्टफॉर्म चालत नाही. त्यात मोठा धोका असतो. कोणतीही शाश्वती राहत नाही. त्यामुळे पैसा दुप्पट करायचा असेल तर तुम्हाला थोडा वेळ देणं गरजेचं असतं. योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि त्यासाठी संयमदेखील आवश्यक ठरतो. त्याच आधारावर आम्ही आपल्यासाठी गुंतवणुकीचे 5 पर्याय सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमचा पैसा दुप्पट करू शकता.
Table of contents [Show]
1. म्युच्युअल फंड (Mutual fund)
गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहे. यामध्ये विविध स्त्रोतांच्या माध्यमातून निधी घेऊन स्टॉक, बाँड, डेब्ट अशांमध्ये गुंतवणूक केली जाते. अधिक परतावा यातून मिळू शकतो. बाजाराशी निगडीत हा पर्याय आहे, त्यामुळे सहाजिकच जोखीमदेखील असते. मात्र परतावा जास्त असल्यानं जोखीम पत्करण्याची तयारी गुंतवणूकदारांची असते. पैसा दुप्पट करायचा असेल तर निधीचा कालावधी त्याचप्रमाणे मुदत या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. फंड परफॉर्मन्सनुसार साधारणपणे 3 ते 5 वर्षांत पैसे दुप्पट होऊ शकतात. पारंपरिक पर्याय निवडले तर 3 ते 5 वर्षांऐवजी 10 वर्षांचाही कालावधी लागू शकतो.
2. शेअर बाजारातली गुंतवणूक (Stock market)
जोखमीनं भरलेला असा हा गुंतवणुकीचा पर्याय आहे. या माध्यमातून शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. जलद पैसा कमवायचा असेल तर शेअर बाजार हा पर्याय चांगला आहे. मात्र अत्यंत जोखीम असलेला हा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला त्यातले बारकावे माहीत असणं गरजेचं आहे. योग्य गुंतवणूक केली तर वार्षिक दोन अंकी परतावा हमखास मिळू शकतो. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्लादेखील तुम्ही घेऊ शकता.
3. मुदत ठेव (Fixed deposit)
मुदत ठेव म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा पारंपरिक मार्ग आहे. इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत एफडीमध्ये सर्वात कमी परतावा मिळत असतो. मात्र अत्यंत कमी जोखीम असल्यानं अनेकजण सुरक्षित पर्याय म्हणून याची निवड करतात. एफडी कॅल्क्युलेटरद्वारे किती व्याजदरानं किती परतावा मिळून शकतो, हे तपासता येईल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास पैसा दुप्पट होऊ शकतो का, याची चाचपणी आधीच करावी.
4. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate)
गुंतवणुकीच्या एका चांगल्या पर्यायामध्ये पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate) याचा समावेश होतो. गुंतवणुकीचा पारंपरिक पर्याय असलेल्या या योजनेत अनेकजण आपला पैसा गुंतवतात. बऱ्याचवेळा तुमच्याकडे पैसे असतात, मात्र तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे योजनेमध्ये ठेवू शकता. पण पोस्ट ऑफिसच्या या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. त्याचप्रमाणे यामध्ये अनेक खाती उघडता येतात. करामध्ये सूटदेखील मिळते. शिवाय चक्रवाढीचा लाभही मिळतो.
5. रिअल इस्टेटमधली गुंतवणूक (Real estate)
गुंतवणुकीच्या पर्यायांमधला हा एक सर्वोत्तम आणि खात्रीशीर मार्ग मानला जातो. हा एक पारंपरिक पर्याय आहे. घराची मालमत्ता किंवा जमीन यामध्ये ही गुंतवणूक केली जाते. ही एक मोठी जबाबदारी असते. खर्चही मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकासाठीच ते शक्य असेल असं नाही. मालमत्तेच्या किंमती वाढल्या तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. काही वर्षांत ही गुंतवणूक दुप्पटही होऊ शकते. तर जमीन किंवा घर भाड्यानं दिलं तर नियमित उत्पन्नदेखील त्या माध्यमातून मिळू शकतं.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)