गेल्या काही महिन्यांपासून तेल, तूप, भाजीपाला, कडधान्ये आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होते आहे. वाढत्या महागाईचा परिणाम जसा आपल्या स्वयंपाकघरावर झालाय तसाच परिणाम हॉटेलमधल्या जेवणावर देखील पहायला मिळतो आहे. एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान CRISIL Research या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात याचा तपशील प्रकाशित केला आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किमतीत 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे.
चिकनला खवय्यांची पसंती
क्रिसिलच्या अहवालानुसार, या काळात मांसाहारी पदार्थात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. चिकन, मटण, अंडी आणि इतर मांसाहारी पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिकनच्या किमतीत 55% पेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.हॉटेलमध्ये जेवणासाठी येणारे बहुतांश नागरिक इतर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत चिकनला पसंती देतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायात चिकनला वर्षभर मागणी असते. चिकनची वाढती मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांनी चिकनच्या दरात सातत्याने वाढ केली होती.
सोबतच तेल, मसाल्याचे पदार्थ, गहू यांचे भाव देखील वाढत आहेत. रशिया-युक्रेन युध्द सुरु झाल्यानंतर भारतासह आशिया खंडात खाद्यतेलांच्या किमती वाढल्या होत्या. आता कुठे खाद्यतेलाचे भाव आटोक्यात येत आहेत. या सर्व कारणांमुळे गेल्या वर्षात मांसाहारी थाळीचे दर 32% पेक्षा जास्त वाढले आहेत.
शाकाहारी थाळी देखील महागली
मांसाहारी थाळीची भाववाढ होत असतांना शाकाहारी थाळी देखील महागली आहे. मागील वर्षात अवकाळी पावसामुळे हिरव्या पालेभाज्या आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पालेभाज्या 6% आणि गव्हाच्या पिठाच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात भरीस भर म्हणून एलपीजीच्या किमती देखील 20% वाढल्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणून शाकाहारी थाळीच्या किमतीत 9% ने वाढ झाली आहे.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला होणारा महागाईचा त्रास कमी व्हावा यासाठी सरकारने देखील प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच परिणाम म्हणून गव्हाच्या किमती आता नियंत्रणात आल्या आहेत. या आठवड्यापासून तेलाच्या किमती देखील काही प्रमाणात कमी होणार आहेत. या सर्व कारणांमुळे
जानेवारीपासून आतापर्यंत शाकाहारी थाळीचे भाव स्थिर आहेत, असे देखील अहवालात म्हटले आहेत. सोबतच जानेवारीपासून मांसाहारी थाळीच्या किमतीतही 2 % घट पहायला मिळते आहे.
येत्या काही दिवसांत भाव कमी होणार
क्रिसिलच्या सर्वेक्षणात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, येत्या काही दिवसांत मांसाहारी आणि शाकाहारी थाळीच्या किमतीत आणखी घट होईल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून खाद्यतेलांच्या किमतीत 16% तर चिकनच्या किमतीत 2-4 टक्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून मांसाहारी आणि शाकाहारी थाळीच्या किमतीत घट पाहायला मिळेल असे अहवालात म्हटले आहे.