UTS App: मुंबईमध्ये बहुसंख्य लोक हे रेल्वेने प्रवास करतात. हा प्रवास करण्यासाठी आवश्यकता असते ती तिकीटाची. रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एटीव्हीएम(ATVM) मशीनसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच यूटीएस अॅप(UTS app) अद्ययावत करण्यात आले असून त्याला सर्वाधिक प्रवाशांची पसंती पाहायला मिळत आहे. यामुळे मोबाईल तिकिटांची विक्री 265 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
UTS मुळे मोबाईल तिकिटांची संख्या झपाट्याने वाढली
हल्ली प्रत्येक मुंबईकरांच्या मोबाईलमध्ये यूटीएस ॲप(UTS app) हे हमखास पाहायला मिळते. या ॲपमध्ये अधिकची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 19 जानेवारीपासून यूटीएस ॲपवर(UTS app) फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमध्ये प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल तिकिटाकडे प्रवाशांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या ॲपद्वारे एप्रिल 2022 मध्ये 74.39 लाख प्रवाशांनी तिकिटांची खरेदी केली होती. तर डिसेंबर 2022 मध्ये 1.35 कोटी प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आहे. यूटीएस ॲपद्वारे जारी केलेल्या तिकिटांचे योगदान डिसेंबर 2022 मध्ये 11.61 टक्के इतके होते. मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात जानेवारी 2022 मध्ये यूटीएस ॲप वापरून तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांची संख्या 37.14 लाखांवर होती, ती डिसेंबर 2022 मध्ये 1.35 कोटी पर्यंत पोहचली. त्यामध्ये 265 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली.
10 किमीच्या परिघात UTS तिकीट काढू शकणार
उपनगरीय विभागासाठी तिकीट बुकिंगच्या अंतराचे निर्बंध सैल करण्यात आले असून ते आता 2 किलोमीटरवरून 10 किमी करण्यात आले आहेत. त्यामुळे वापरकर्ते उपनगरीय स्थानकांसाठी स्टेशनपासून 10 किमीच्या परिघात यूटीएस(UTS) तिकीट बुक करू शकणार आहेत. या शिथिलतेमुळे यूटीएस तिकिटांची निवड करणाऱ्या प्रवाशांच्या वाढीला मोठी चालना मिळणार आहे.