ही फर्निचर कंपनी (Furniture Company) आहे अमेरिकेतली (USA). नोव्हेंबर महिन्यात फर्निचर बनवणाऱ्या या कंपनीच्या मालकाने एका शुक्रवारी आपल्या कंपनीतल्या तब्बल 2,700 कर्मचाऱ्यांना संध्याकाळी फक्त एक टेक्स्ट मेसेज (Text Message) पाठवला. यातल्या काहींना ईमेलही (Email) केले. आणि एका ओळीत सांगितलं, ‘ तुम्हाला कामावरून कमी करण्यात येत आहे. ’ पुढे कुठलंही स्पष्टीकरण या उद्योजकाने दिलं नव्हतं. ही घटना अमेरिकन वर्तुळात नक्कीच गाजली. आणि हे प्रकरण ‘चीड आणणारं’ असल्याचं वृत्तपत्रांनी म्हटलं होतं.
युनायटेड फर्निचर इंडस्ट्रीज असं या कंपनीचं नाव आहे. आणि ओहायो राज्यात नोंदणी झालेल्या या फर्निचर उत्पादन कंपनीचे मालक आहेत डेव्हिड बेलफोर्ड. कंपनीचे कारखाने नॉर्थ कॅरोलिना, मिसिसिपी आणि कॅलिफोर्निया या राज्यांतही आहेत. आणि कंपनी काही काळ तोट्यात होती. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर मालक डेव्हिड बेलफोर्ड हे भूमिगत झाले होते. मीडियाच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली नाहीत. कारखान्यांमध्ये किंवा सामाजिक वर्तुळात ते कुणालाही महिनाभर दिसले नाहीत.
पण, आता एक महिना उलटल्यावर डेव्हिड बेलफोर्ड पुन्हा अवतरले आहेत. ‘कंपनीत जे घडलं ते प्रचंड वेदनादायक होतं,’ असं त्यांनी स्वत:च एका मुलाखतीत म्हटलंय. त्यांनी केलेली नोकर कपात थँक्स गिव्हिंग या अमेरिकेतल्या मोठ्या सणाच्या एक दिवस आधी 21 नोव्हेंबरला केली होती. म्हणूनही त्यांच्या निर्णयाकडे आश्चर्याने पाहिलं जात होतं.
आता स्थानिक मीडियाशी बोलताना डेव्हिड यांनी, ‘नोकर कपातीचा निर्णय क्लेशकारक होता. पण, त्या घटनेचे आपणही मूक साक्षीदार होतो. मी त्या कंपनीत फक्त एक गुंतवणूकदार होतो,’ असा बचावही त्यांनी केला आहे.
तर काही मीडिया संस्थांनी मधल्या काळात बेलफोर्ड यांनी नवीन कर्मचारी भरती केली असून आपली काही मालमत्ता विकून पैसे उभे केल्याचं म्हटलं आहे.