पेप्सी, मिरिंडा, माऊंटन ड्यू अशी शीतपेयं जगभर लोकप्रिय आहेत. आणि ती बनवणारी कंपनी पेप्सिको (PepsiCo) त्यामुळे जगप्रसिद्ध आहे. बहुराष्ट्रीय अन्न प्रक्रिया कंपनी असलेली पेप्सिको लवकरच मोठी नोकर कपात करणार असल्याची बातमी अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने (Wall Street Journal)दिली आहे. त्यामुळे अमेरिकन बाजारात मोठी खळबळ माजली आहे. कारण, टेक किंवा माहिती-तंत्रज्ञान कंपन्या नोकर कपातीचे संदेश देत असताना आता ग्राहकोपयोगी उत्पादनं आणि अन्न प्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या कंपन्यांमध्येही मंदीने शिरकाव केल्याचं चिन्ह दिसत आहे.
आताची नोकर कपात ही कंपनीच्या उत्तर अमेरिकेत असलेल्या मुख्य शाखेत होणार आहे. आणि अमेरिकेतली सध्याची मंदी त्याला कारणीभूत आहे. पेप्सिकोनं एक पत्रक काढून याविषयीची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली असल्याचं समजतंय. आणि ती देताना नोकर कपात ही कामकाजाच्या सुलभीकरणासाठी असल्याचं म्हटलंय.
पेप्सिको कंपनी वर उल्लेख केलेल्या शीतपेयांबरोबरच फ्रिटो-लेज चिप्स, क्वेकर ओट्स असे स्नॅक्सही बनवते. आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जसं की साखर, मका, बटाटा इ. महाग झाल्यामुळे कंपनीचा उत्पादन शुल्क काही दिवसांत वाढला आहे. पण, त्या प्रमाणात वस्तूंचे दर कंपनीला वाढवता येत नाहीएत. कंपनीच्या उत्पादनांची बाजारपेठ किंवा वस्तूंचा खप कमी झाला नसल्याचं कंपनीनं आवर्जून नमूद केलंय.
जगभरात सध्या महागाई दरा चढा आहे. आणि त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होतोय. यापूर्वी अमेरिकेतच वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी चॅनल, सीएनएन इंटरनॅशनल या मीडिया कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.
तर ह्यूलेट पॅकार्ड या कंपनीने तर पुढच्या तीन वर्षांत 6,000 लोकांना काढून टाकणार असल्याचं म्हटलंय. ही नोकर कपात सध्या अमेरिके पुरती असली तरी ही बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे तिचे पडसाद जगभरात पडणार आहेत.
तंत्रज्ञान, मीडिया आणि पाठोपाठ ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन कंपन्यांमध्ये सध्या महागाईमुळे मंदीचं सावट दिसत आहे.