Tesla Layoff: दोन महिन्यांपूर्वी ट्विटर कंपनी विकत घेणाऱ्या इलॉन मस्क याने ट्विटरमधील सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना फायर करून आता त्याने आपला मोर्चा टेस्ला कंपनीकडे वळवला आहे. मस्कने येत्या नवीन वर्षात कर्मचारी कमी करण्याची योजना जाहीर केली. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपल्या कंपनीतील नवीन कर्मचाऱ्यांची भरती थांबवली असून लवकरच म्हणजे नवीन वर्षात कर्मचारी कमी करण्याची (Layoff) योजना आखली आहे, अशी माहिती दी इलेक्ट्रेक (The Electrek) या न्यूज वेबसाईटने दिली आहे.
दी इलेक्ट्रेक या वेबसाईटने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती थांबवली असून येणाऱ्या काळात कार्यरत कर्मचाऱ्यांमधून काही कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. पण टेस्लाने काही भागात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी कंपनी काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार आहे. कंपनीचे असे एक्सपान्शनचे नियोजन असताना मध्ये कंपनीने नोकरभरती का थांबवली याबाबत कळू शकलेले नाही.
टेस्लाने जाहीर केलेली कर्मचारी कपातीची घोषणा हा या वर्षातील दुसरा टप्पा आहे. यापूर्वी कंपनीने जून, 2022 मध्ये 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले होते. मस्कने जूनमध्ये असेही म्हटले होते की, कंपनी येत्या 3 महिन्यात अंदाजे 10 टक्के कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कमी करेल. कंपनीतील 10 टक्के कर्मचारी म्हणजे सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे ते संकेत होते.
इलॉन मस्कने सध्याच्या आर्थिक घडामोडीबद्दल आणि एकूणच त्याला होत असलेल्या नुकसानीमुळे ‘सुपर बॅड फिलिंग’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने असेही म्हटले आहे की, सध्या एकूण नियमित कर्मचाऱ्यांपैकी 3.5 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागी प्रति तासावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. दरम्यान, मस्कने ट्विटरच्या सीईओ पदासाठी पर्याय मिळाल्या तो त्या पदावरून पायउतार होणार आहे. ट्विटर (Twitter)मध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळामुळे टेस्लाच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. टेल्सा कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होऊ लागली आहे. मस्कने 44 बिलिअन डॉलरला ट्विटरची खरेदी केल्यानंतर ट्रविटरमधील सुमारे 3700 कर्मचाऱ्यांना कमी केले होते.