देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) ने अलीकडेच नवीन Tiago EV च्या किमती जाहीर केल्या. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) साठी 10 ऑक्टोबर रोजी बुकिंग सुरू केलेले आहे. या इलेक्ट्रिक हॅचबॅकला आतापर्यंत 20 हजार इतके बुकिंग मिळाले आहे. मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. सध्या त्याचा प्रतीक्षा कालावधी 4 महिन्यांपर्यंत आहे. निवडक शहरांमध्ये फक्त 2 महिन्यात मिळू शकते.
Tata Tiago EV ही कार XE, XT, XZ+ आणि XZ+ टेक लक्स ट्रिम्स आणि दोन बॅटरी पॅक 19.2kWh आणि 24kWh पर्यायांमध्ये येते.
21 हजार रुपये टोकन रक्कम
नवीन Tata Tiago EV ज्यांना खरेदी करायची आहे असे ग्राहक 21 हजार रुपये टोकन रक्कम भरून कार बुक करू शकतात. Tata Tiago EV ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात नवीन इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जाते. आणि ती सर्वाधिक स्वस्त म्हणून देखील ओळखली जाते. 8.49 लाख रुपये एक्स-शोरूम प्राइज अशा सुरुवातीच्या किमतीत लाँच केलेली Tiago EV ग्राहकांसाठी एकूण 7 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
टेस्ट ड्राइव्ह डिसेंबर 2022 पासून
कारची टेस्ट ड्राइव्ह डिसेंबर 2022 च्या अखेरीस सुरू होणार आहे तर त्याची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी तारीख ही प्रकार, रंग, बुकिंग वेळ आणि तारीख यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ग्राहकांच्या पसंती आणि मागणीनुसार, 24kWh बॅटरी पॅक व्हेरियंटला उत्पादनासाठी प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
बॅटरी आकार, बॅटरी चार्जिंग वेळ
19.2 kWh युनिट आणि अधिक शक्तिशाली 24 kWh युनिट अशा दोन बॅटरी पर्यायांसह Tiago EV ऑफर केली जात आहे. यातील प्रत्येक बॅटरी पॅक ही वेगवेगळी रेंज देते. दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ही कार ऑफर करून दैनंदिन ड्रायव्हिंगची गरज असलेल्या विविध प्रकारच्या खरेदीदारांना आकर्षित करण्याचा टाटा मोटर्सचा उद्देश असल्याचे दिसत आहे.
Tata Tiago EV ही कार फास्ट चार्जिंग पर्यायाला सपोर्ट करते. DC फास्ट चार्जर वापरून बॅटरी 57 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के इतकी चार्ज केली जाऊ शकते. इथे हे लक्षात घ्यायला हव की हा आदर्श आणि फास्ट चार्जिंग टाइम आहे.
24 kWh युनिट बॅटरीसह ऑफर केलेली Tiago EV सुमारे 315 किमी तर Tiago EV 19.2 kWh बॅटरीसह 250 किलोमीटरपर्यंत धावू शकते. हे ड्रायव्हिंग रेंजचे आकडे चाचणी संबंधीचे आहेत. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास असा वेग पकडू शकते. यात दोन ड्राइव्ह मोड आहेत.यामध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, पाऊस-सेन्सिंग वाइपर, क्रूझ कंट्रोल, 8-स्पीकर हरमन साउंड सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि बरेच काही देखील मिळते.