Agricultural Innovation: नागपूर जिल्ह्यातल्या कचारी सावंगामधले एक शेतकरी अनंत भोयर त्यांच्या सेंद्रीय शेतीच्या प्रयोगासाठी ओळखले जातात. अंबाडी भाजीची लागवड करून त्यापासून वेगवेगळे प्रयोग करण्याच्या त्यांच्या उपक्रमाविषयी तुम्ही महामनीवर वाचलं असेलच. आज जाणून घेऊया त्यांनी सुरू केलेल्या गावकुस या कृषि उन्नती संस्थेविषयी.
Table of contents [Show]
नैसर्गिक शेती करता करता सुचली गावकुसची कल्पना..
19 - 20 वर्षांचे असताना अनंत आपल्या वडिलांबरोबर शेतीच्या कामाला लागले. सुरुवातीला त्यांचा कल वडिलांबरोबर राहून शेती कशी करायची हे शिकण्याचाच होता. त्यामुळे वडिलांच्या प्रत्येक कामाच्या वेळी ते त्यांच्याबरोबर असायचे.
असेच एकदा शेतमाल विकायला ते वडिलांबरोबर बाजारपेठेत गेले होते. तिथली पद्धत अजीब होती. शेतकरी स्वत: खर्च करून ट्रॅक्टरला मागे शेतमालाची गाडी जोडून बाजारात यायच्या. तिथे मालाचे ढिगारेच्या ढिगारे रचलेले असायचे. आणि मग मधले दलाल लोक शेतकऱ्याच्या मालावर बोली लावायचे.
ज्याची बोली सर्वात जास्त त्या मध्यस्थाला शेतकरी माल विकणार हे खरंच. पण, तो भावही रास्त नव्हताच हे तरुण अनंताच्या लगेच लक्षात आलं. मूळात वाईट या गोष्टीचं वाटत होतं की, ‘तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाचा दर दुसराच कुणी व्यक्ती का ठरवतो?’ हा मध्यस्थ म्हणजेच ज्याला कृषि बाजारपेठेत अडते म्हणतात तोच.
त्यामुळे स्वत: शेती करायला लागेपर्यंत अनंत यांच्या मनात दोन गोष्टी पक्क्या झाल्या होत्या. एक म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करण्याचा (त्याने शेतीचा कस कमी होतो, असं त्यांचं म्हणणं होतं) आणि दुसरं आपल्या शेतमालासाठी बाजारपेठ तयार करण्याचा.
आणि त्यातूनच अनंत यांनी 2006 मध्ये गावकूस ही ग्रामीण विकास व कृषि उन्नयन संस्था सुरू केली. 2008 मध्ये संस्थेची नोंदणीही पार पडली.
धरणी आईच्या कुशीत राहून केलेला विकास
अनंत यांनी सेंद्रीय शेतीचा घेतलेला वसा आणि शेतमालाच्या बाजारपेठेची जबाबदारी या दोन्ही गोष्टी अवघड होत्या. त्यासाठी आजबाजूच्या शेतकऱ्यांची मदत लागणार होती. आणि दुसरं म्हणजे आपल्या मोहिमेत इतरांना सामील करून घेतलं तर त्यातूनच विकास साध्य होईल याविषयी अनंत यांना शंका नव्हती. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!’ यावर त्यांचा विश्वास होताच.
म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आणि स्वत: पुढाकार घेऊन ही संस्था सुरू केली. तिला गावकुस नाव देण्याची कल्पनाही त्यांचीच.
‘जे काही करायचं ते धरणी मातेशी प्रामाणिक राहून, हे ठरलेलंच होतं. शेतीच्या आणि गावाच्या विकासासाठी प्रयोग करायचे ही माझी तळमळ होती. ती लोकांपर्यंत पोहोचली. आणि सगळ्यांना मी सुचवलेलं नावही आवडलं. गावाच्या कुशीत राहून केलेला गावाचा विकास म्हणून गावकूस असं नाव आम्ही संस्थेला दिलं,’ अनंत भोयर यांनी महामनीशी बोलताना सांगितलं.
संस्था सुरू झाली आणि तिचं काम झपाट्याने सुरू झालं. स्वत: अनंत आणि त्यांच्या पत्नी वंदनाताई सुरुवातीपासून यात लक्ष घालत होत्या. आजूबाजूचे शेतकरीही मिसळत गेले. आणि मग सेंद्रीय शेतीचा प्रसार, बिष-मुक्त अन्नाची निर्मिती, देशी बियाणांचा उत्पादनासाठी वापर, शेतमाल मूल्यवर्धन या शेतीशी संबंधित कामांबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन आणि पारंपरिक कलांचं संवर्धन ही कामंही संस्थेनं सुरू केली.
गावकूस संस्थेचे विविध उपक्रम
पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे कसं वळता येईल हा तर अनंत भोयर यांच्या संशोधनाचाच विषय होता. आणि नैसर्गिक शेती हीच शाश्वत शेती आहे हा त्यांचा विश्वास होता. पण, तो इतरांना पटवून द्यायचा तर शेतातलं उत्पन्न या पद्धतीने वाढलं पाहिजे, तर लोकांचा विश्वास बसेल. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची पद्धत नीट कळली पाहिजे.
त्यामुळे गावकूसच्या वतीने पहिला उपक्रम राबवला गेला तो सेंद्रीय शेतीच्या प्रशिक्षणाचा. राज्यसरकारच्या मदतीने आयोजित केलेल्या पहिल्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला 21 शेतकरी हजर होते. यातून अनंत आणि सहकाऱ्यांचा विश्वास आणखी वाढला.
त्यांनी आजूबाजूच्या गावात जाऊन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षणात प्रॅक्टिकल्सचा भाग जास्त असेल हे पाहिलं. आणि पुढे पुढे त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. याची सुरुवात झाली ती 70 शेतकऱ्यांना दिलेल्या ट्रॅक्टर प्रशिक्षणाने. विशेष म्हणजे यात महिलांचाही सहभाग होता. आणि पुढे महिलांसाठी संस्थेनं खास वेगळे ट्रॅक्टर प्रशिक्षण वर्ग सुरू केले. कारण, त्यांची संख्या खूप वाढली.
अशा एका प्रशिक्षण वर्गात शिकलेल्या योगिता पवार महामनीशी बोलताना म्हणाल्या, ‘माझ्या हातात ट्रॅक्टरची चावी आली तो दिवस मला अजून आठवतो. एखादी वस्तू माझ्या मालकीची असू शकते हा विचारच छान आणि मला समृद्ध करणारा वाटत होता.’
आणखी एक महिला शेतकरी मनिषा पवार यांनीही योगिता यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. ‘घरच्या शेतीत आणि शेत कामांमध्ये महिलांचा सहभाग पूर्वीही होताच. पण, गावकूसने स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलंय. त्यातून जे समाधान मिळतं ते महत्त्वाचं आहे. त्यातून आम्हाला नवीन उमेद मिळते.’
अनंत यांच्या पत्नी वंदना भोयरही त्यांच्या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. आणि गावकुस संस्थेत त्या प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी सांभाळतात.
महिलांना मजुरीत समसमान वाटा
अनंत भोयर यांनी अंबाडी लागवडीला सुरुवात केली तेव्हा महिलांना दिवसाला 50 रुपये तर पुरुषांना 100 रुपये दर दिवसाची मजुरी मिळत होती. अर्थात, पुरुषांकडून जास्त अंगमेहनतीच्या कामांची अपेक्षा होती.
पण, मागच्या दहा वर्षांत अनंत भोयर यांच्या संस्थेनं ही तफावत भरून काढण्यासाठीही प्रयत्न केले. सरसकट आठवड्याला 2000 रुपये इतकी मजुरी आता संस्थेत दिली जाते. पण, अनंत यावर गंमतीने म्हणतात, ‘आठवड्याची मजुरी वाढली तरी ती ही हल्ली पुरत नाही, इतकी महागाई वाढलीय. ही महागाईचीच अवकृपा म्हणावी लागेल.’
अनंत भोयर यांना त्यांनी केलेल्या अविरत कामासाठी राज्यसरकारकडून 2009 साली कृषिभूषण पुरस्कार, धरती-मित्र पुरस्कार तर सेंद्रीय शेतीसाठी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही मिळाला आहे.
गावकूस संस्थेला सरकारकडून फंड मिळत नाही. काही शेतकरी संस्थांकडून मिळालेल्या फंडातून काही प्रशिक्षण राबवली जातात. आपण केलेल्या कामाचा सर्वात महत्वाचा मोबदला म्हणजे समाधान, तेच अनंत यांना यातून मिळत आहे. मिळालेल्या फंडातून गावाचा भरपूर विकास साधण्याचा प्रयत्न यांनी केलाय. कमी खर्चात गावाला विकासाच्या वाटेवर आणण्यास अनंत भोयर आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे.