Natural Farming: नागपूर (Nagpur) सारख्या मोठ्या जिल्ह्यात कचारी सावंगा हे गावच शेतकरी अनंत भोयर यांचं गाव म्हणून हल्ली ओळखलं जातं. पण, स्वत: अनंत यांना त्यांची ओळख ‘नैसर्गिक शेतकरी’ अशीच असावी असं वाटतं. कारण, आपलं आतापर्यंतचं आयुष्य त्यांनी त्यासाठी दिलंय.
मागची सोळा वर्षं ते आपल्या शेतात अंबाडी भाजीचं पीक घेतात. आणि सोबत अंबाडीच्या रोपातून वेगवेगळी बाय-प्रॉडक्ट्सही घेतात. आणि हळूहळू यातून त्यांनी गावकुस नावाची स्वत:ची संस्थाच उभी केली आहे. त्यासाठी राज्यसरकारकडून 2009 साली कृषिभूषण पुरस्कार, धरती-मित्र पुरस्कार तर सेंद्रीय शेतीसाठी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही घेतला आहे. या काळात त्यांनी केलेले नैसर्गित शेतीचे प्रयोग, अंबाडीच्या पिकावर केलेलं संशोधन आणि त्यातून केलेली जेली ते चहा ही उत्पादनं हे सगळं आश्चर्यचकित करणारं आणि तितकंच प्रेरणादायी आहे.
नैसर्गिक शेतीला सुरुवात….
अनंत भोयर हे खरंतर हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. अख्ख्या नागपूर जिल्ह्यात त्यांची ओळख कादंबरीकार, बासरीवादक, सेवाभावी कार्यकर्ते अशी आहे. आणि सुरुवातीला त्यांचं लक्ष या छंदांकडेच होतं.
बारावीनंतर त्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेशही घेतला होता. पण, दुसऱ्या वर्षाला एका आजारपणामुळे त्यांनी कॉलेज अर्धवट सोडलं. घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे वडिलांची इच्छा होती, त्यांनी शेतीत यावं. मग त्यांनी वडिलांबरोबर शेतावर जायला सुरुवात केली. आधी त्यांची भूमिका फक्त बघ्याचीच होती. वडील काय करतात हे ते बघत होते, निरीक्षणं नोंदवून ठेवत होते.
वडिलांच्या शेतीच्या पद्धतीत आणि माल-विक्रीच्या पद्धतीत त्यांनी दोन महत्त्वाची निरीक्षणं लिहून ठेवली.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांप्रमाणेच आपले वडीलही शेताला रासायनिक खतांनी अगदी न्हावू घालतात. आणि मग दरवर्षी उत्पादन कमी कमी होत जातं. पीक नियोजन बरोबर होत नाही. दुसरी गोष्ट त्यांना खटकत होती ती म्हणजे, शेतकऱ्याने दिवस-रात्र एक करून पीक घ्यायचं आणि मंडईत जेव्हा आपला माल घेऊन शेतकरी जातो तेव्हा दलाल कवडीमोल दरात पीक विकत घेणार. म्हणजे पिकाचा भाव त्रयस्थ दलालाच्या हाती. हे अनंत यांना मान्य नव्हतं.
त्यामुळे शेती करायला घेतल्यावर या दोन्ही गोष्टींचा एकत्र विचार त्यांनी सुरू केला.
सगळ्यात आधी त्यांनी शेताचे तीन भाग पाडले. आणि एका भागात पूर्णपणे सेंद्रीय शेती सुरू केली. 2004 मध्ये केलेल्या पहिल्याच वर्षी त्यांना यश मिळालं. आणि अनंत भोयर स्वत: म्हणतात त्याप्रमाणे, ‘सेंद्रीय शेतीला यशही मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे समाधान मिळत होतं. हा काही नुकसान करणारा सौदा नाही हे कळल्यावर घरच्यांचीही साथ मिळाली. आणि पुढे पूर्ण शेती सेंद्रीय करायला सुरूवात केली.’
हळूहळू अनंत यांचे आजू बाजूचे शेतकरीही त्यांच्या मागोमाग सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. हा झाला शेतीतला एक प्रयोग. दुसरा प्रयोग होता तो पीकही आपणच घ्यायचं आणि त्याची विक्री, मार्केटिंगही आपणच करायचं हा. त्यासाठीही त्यांनी अंबाडीचीच भाजी निवडली.
अंबाडी लागवडीची कल्पना कशी सुचली?
अंबाडी लागवडीची कल्पनाही अनंत यांचीच. महामनीशी याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘फार पूर्वी विदर्भात निदान चटणीसाठी तरी अंबाडीचं पीक घ्यायचे. पण, एकल पीक पद्धतीमुळे अंबाडी मागे पडली. आणि तणनाशकांचा उपयोग सुरू झाल्यावर तर अंबाडी लागवड जवळ जवळ बंदच झाली.’
पण, शेतीचा आणि शेतमालाच्या मार्केटिंगचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या अनंत यांना अंबाडी पिकाची बहुउपयोगिता लगेच लक्षात आली.
‘अंबाडीचं खोड, पानं, फुलं, बिया आणि फळ अशा सगळ्यांचाच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अंबाडी बहुपयोगी कल्पवृक्षच आहे. खोडापासून ताग, पानांची भाजी, लोणचं, कोळवा, तर फुलांपासून जॅम, जेली, सरबत असे उपपदार्थ बनतात. बियांपासूनही तेल निघतं, मुखवासाचे पदार्थ बनतात. आणि फळाचाही वापर शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो,’ अंबाडीचा एकेक उपयोग अनंत यांनी सांगायला सुरुवात केली.
अंबाडीच्या फळापासून ते अगदी चहा आणि सरबतही बनवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याच गावकुस या सेंद्रीय शेती ग्रुपने उभ्या केलेल्या संस्थेत या वस्तू बनवून ते राज्यभर विकतात.
अर्थात, हा प्रयोग काही पहिल्याच प्रयत्नांत यशस्वी झाला नाही. कारण, अंबाडीचं उत्पादन घेण्यापुरतं ठिक होतं. पण, पुढे त्यापासून विविध वस्तू तयार करणं आणि त्यांचं मार्केटिंग हे सगळं परीक्षा पाहणारं होतं. या काळात त्यांची पत्नी वंदना भोयर यांची साथ त्यांना मिळाली.
मार्केटिंगसाठी अनंत भोयर गावोगावी फिरत असताना वंदनाताई शेती आणि गावकुस करखान्याचा कारभारही सांभाळत होत्या.
‘आम्ही जे करत होतो ते नवीन होतं. अंबाडीवर केलेले अनेक प्रयोग फसले, कामगार प्रशिक्षित नव्हते. कारखान्यात योग्य उपकरणं नव्हती. अशा अनेक अडचणी आल्या. पण, आम्ही थांबलो नाही. मजूर वर्गाला वेळोवेळी प्रशिक्षण दिलं. आणि मेळावे आयोजित करून किंवा मेळाव्यांना भेटी देऊन आमच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण केली,’ वंदनाताईंनी आपला अनुभव महामनीशी बोलताना सांगितला.
वंदनाताई गावकुस संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमांचं नियोजन आणि गावकुसच्या उत्पादनाचं प्रोसेसिंग या जबाबदाऱ्या पार पाडतात.
अंबाडीची लागवड ते इतर प्रक्रिया उद्योग
अंबाडीची लागवड आंतरपीक म्हणून ओळीने पेरून किंवा फेकीव पद्धतीने पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यावर करतात. अनंत भोयर या लागवडीत कुठेही रासायनिक खतांचा वापर करत नाहीत.
अंबाडीची पानं ही अर्थातच भाजी म्हणून विकली जातात. त्यांचे फायदेही अनंत व्यवस्थित समजावून सांगतात. ‘अंबाडी हिरवी भाजी आहे, त्यामुळे रक्तात हिमोग्लेबिन वाढतं, मासिक पाळीच्या समस्या कमी होतात, भूक आणि पचनशक्ती वाढते तसंच वजन नियंत्रित राहायलाही मदत होते,’ अनंत यांनी महामनीशी बोलताना सांगितलं.
भाजीनंतर पुढचा भाग आहे तो पाकळ्या, फुलं, फळं वेगळी करून त्यावर प्रक्रिया करण्याचा. हा तंत्रज्ञान आणि मेहनतीचा भाग आहे. त्यातली क्लिष्टता समजावी म्हणून अनंत यांनी चहा पावडरीचं उदाहरण दिलं.
‘10 किलो अंबाडीच्या ओल्या पाकळ्या वाळवल्या नंतर त्यातून 1 किलो पावडर बनते. त्याला वस्त्रगाळ करावे लागते, पाकळ्यांपासून मऊ पावडर बनवणे यामध्ये शारीरिक मेहनत आहे. पावडर हा पहिला टप्पा आहे,’ अनंत उपपदार्थांबद्दल सांगत होते.
‘पुढे पावडरीवर उत्पादनानुसार प्रक्रिया करावी लागते. म्हणजे सरबत असेल तर जिरं, मिरी, साखर घालणं, चहा असेल तर त्याचं वेगळं प्रोसेसिंग असं करून प्रत्येक उपपदार्थ तयार केला जातो. नंतर पॅकेजिंग केलं जातं. असं सगळं करून एक किलो उपपदार्थाचा दर हा 1,300 रुपयांपर्यंत पोहोचतो,’ अनंत यांनी अख्खी प्रक्रिया आपल्यासमोर उलगडून सांगितली.
या उत्पादनांचं पॅकेजिंग करून ते विक्रीला नेण्याचं तंत्रही अनंत यांनी स्वत: अनुभवातून विकसित केलं आहे.
उपपदार्थांची जाहिरात करण्यासाठी त्यांनी अक्षरश: देश पिंजून काढला आहे. वेगवेगळ्या शहर आणि गावांमध्ये भरणारे शेतकरी मेळावे, ग्राहक मेळावे यामध्ये जाहिरात करणं, गावकुस संस्थेचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठीही त्यांनी मेहनत घेतली आहे. अलीकडच्या काळात तर गावकुसच्या प्रॉडक्ट्सची विक्री ऑनलाईनही होत आहे.
‘कोरोनाने आम्हाला ऑनलाईन विक्रीविषयी शिकवलं. पण, त्याचा फायदाच झाला. कारण, इतर उद्योगांचं कोरोना काळात नुकसान झालं तेव्हाही आम्ही नफ्यात राहू शकलो. उलट आमचा उत्पादन आणि प्रक्रियेचा वेग वाढला. सोळा वर्षांपूर्वी आम्ही उत्पादन सुरू केलं तेव्हा एका महिला कामगाराला आम्ही दिवसाची मजुरी 50 रुपये देत होतो, ती आता कुशल कामगारांसाठी आठवड्याला 2,000 रुपयांवर पोहोचली आहे,’ अनंत भोयर यांनी सांगितलं.
विक्री कशी केली जाते?
उत्पादनानंतर अंबाडीच्या फुलांवर, बियांवर आणि पानांवर प्रक्रिया केली जाते. तयार उत्पादनांना आकर्षक पॅकिंग करून ते गावकुस या सेंद्रिय शेती समूहाच्या ब्रँडनेम अंतर्गत ग्राहकांना विकले जाते. त्यासाठी देश भरामध्ये होणारे विविध सेंद्रिय शेत मेळावे आम्ही अटेंड करून आमच्या प्रॉडक्टची विक्री करतो. त्याचबरोबर आता ऑनलाइन विक्रीही सुरू केली आहे. कोरोंना काळात ऑनलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असे अनंत भोयर यांनी महामनिशी बोलतांना सांगितले.
विशेष म्हणजे अजूनही विदर्भातला शेतकरी अंबाडीचा वापर फक्त भाकरीसाठी करत आहे. पण, त्याच अंबाडीपासून विविध प्रोडक्ट बनवून त्याचं यशस्वी मार्केटिंग केलेले अनंत भोयर एकटे आहेत. त्यांनी सुरू केलेला गावकुस उपक्रमही समजून घेण्यासारखा आहे.
अंबाडी प्रॉडक्ट आणि इतर शेत मालाचा वार्षिक टर्नओव्हर
साधारण मार्केट उत्पन्न | व्हॅल्यू अॅडिशन |
टोटल इन्कम : 208100 | टोटल इन्कम : 451300 |
टोटल खर्च : 234000 | टोटल खर्च : 234000 |
निव्वळ नफा : -25900 | निव्वळ नफा : 217300 |