इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. खासकरुन माहिती-तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेटमधील कामाच्या तासांबाबत नारायण मूर्ती यांनी दिलेल्या सल्ल्यावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे आठवड्याला 80 ते 90 तास काम करायचे, असा दावा केला आहे.
सुधा मूर्ती यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती यांच्या श्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की एक वेळी होती जेव्हा नारायण मूर्ती आठवड्याला 80 ते 90 तास काम करायचे त्यापेक्षा कमी काम त्यांनी केले नाही. त्यांनी कठोर परिश्रम केले, असे सुधा मूर्ती यांनी सांगितले.
नारायण मूर्ती परिश्रमाला प्राधान्य द्यायचे आणि ते तसे वागायचे. त्यांचा मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी तरुणांना आठवड्याला किमान 70 तास काम करण्याचा सल्ला दिला, असे सुधा मूर्ती यांनी या मुलाखतीत सांगितले.
नारायण मूर्ती यांनी भारताची एकूण उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी आठवड्याला किमान 70 तास काम करायला हवे, सल्ला दिला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्याप्रकारे जपान आणि जर्मनी या देशांतील कामगारांनी अतिरिक्त श्रम करुन देशाला उभे केले. तसेच भारतातील तरुणांनी कामावर भर द्यायला हवा, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. मात्र कॉर्पोरेटमधील फाईव्ह डेज विक आणि वर्क कल्चर पाहता हा सल्ला कामाचा ताण वाढवणारा आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते.
नारायण मूर्ती यांच्या आठवड्याला 70 तास काम हा फॉर्म्युला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करेल, असे मत कॉर्पोरेट्समधील जाणकारांनी व्यक्त केले होते. अतिकामाच्या ताणाने हृदय रोगाचा धोका वाढत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
कामाचे तास वाढवले म्हणजे क्षमता वाढेलच असेही नाही. कामाचे तास वाढल्यामुळे कामाचा दर्जा ढासळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांकडून वारंवार चुका होणे, सतत कामाचा ताण असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढणे. यामुळे गैरहजेरीचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आठवड्याला 70 तास कामाचा सल्ला अनेकांनी भारतासाठी सोयीस्कर नसल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे कंपन्यांसाठी देखील आठवड्याचे कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ साधण्याचे आव्हान आहे. कंपन्यांमध्ये सदृढ वर्क कल्चर ठेवताना कामाचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांचे निरोगी मानसिक आरोग्य यांचा समतोल ठेवावा लागेल. नोकरी व्यक्तिरिक्त कर्मचाऱ्याचे व्यक्तिगत आयुष्य असते. यात त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार यांना तो वेळ देतो. त्याचे छंद तो जोपसतो. कामाचे तास वाढले तर यातील अनेक गोष्टींना त्याला मुकावे लागेल. तो कामाच्या ताणाने दबला जाईल, असाही अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.