Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sundar Pichai India Tour : गुगल सीईओंना भारत दौऱ्यात काय लक्षात राहिलं? 

Sundar Pichai

Image Source : www.mashable.com

Sundar Pichai India Tour : गुगलर्सशी भेटीगाठी, उद्योजकांबरोबर बैठका आणि भारतीय थाली यामुळे आपल्याला नवचैतन्य मिळाल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आणखी काय लिहिलंय?

गुगल (Google Inc) या सगळ्यात मोठ्या इंटरनेट कंपनीचे सीईओ (CEO) झाल्यावर भारतीय वंशाचे सुंदर पिचाई (Sundar Pichai) पहिल्यांदाच या आठवड्यात भारतात आले. मूळचे कोइंबतूरचे (Coimbtore) असलेले सुंदर पिचाई (Sundar Pichai) तब्बल दहा वर्षांनंतर भारतात परतले. आणि यावेळी ते सरकारी पाहुणे होते. इथल्या चार दिवसांच्या भेटीगाठींमध्ये त्यांनी काय केलं याचं सविस्तर वर्णन करणारी एक इन्स्टाग्राम पोस्टच (Sundar Pichai's Instagram Post) सुंदर पिचाईंनी टाकलीय. आणि यात आठ महत्त्वाचे फोटो आहेत. या सगळ्यांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय.    

सुंदर पिचाई यांनी कुणाचे आभार मानले? Sundar Pichai is Grateful For…?   

‘गुगलर्स, उद्योजक आणि भारतीय थाली!’ अशी त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केलीय. आणि या सगळ्यांच्या भेटीगाठींमुळे आपल्याला नवचैतन्य आलंय असंही ते म्हणतात. पिचाई यांनी शेअर केलेल्या आठ फोटोंमध्ये सुरुवातीलाच आहे त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर (Narendra Modi) झालेल्या भेटीचा फोटो. या भेटीत पिचाई यांनी गुगल कंपनीच्या वतीने भारताला जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. आणि आवश्यक त्या सर्व सहकार्याची हमीही दिली.   

तसंच गुगल कंपनीवर भारतात अलीकडे लादलेल्या 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंडावरही त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचं समजतंय. याशिवाय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्याबरोबर पिचाई यांनी फायरप्लेस चर्चा केली. अश्विनी वैष्णव गुगलने आयोजित केलेल्या गुगलमीटमध्येच सहभागी झाले होते. माहिती-तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रात भारताने केलेल्या निर्यातीचं पिचाई यांनी कौतुक केलं.   

‘भारताने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या निर्यातीत मोठी मजल मारली आहे. आणि इथले कुशल तंत्रज्ञ पाहिले तर आणखी मोठा पल्ला गाठण्याची क्षमता भारतात आहे, हे उघड आहे. आणि त्यासाठी सहकार्याच्या संधी आम्ही निर्माण करू. UPI आणि गुगल पेमध्ये आम्ही भारताचं सहकार्य घेतलं आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातही भारताकडून अशीच अपेक्षा आहे,’ असं पिचाई यावेळी म्हणाले.    

सुंदर पिचाई ‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमाच्या आठव्या सत्रासाठी भारतात आले होते. आणि त्याअंतर्गत त्यांनी दिल्ली तसंच बंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला. आणि त्याचेच फोटो त्यांनी या पोस्टमध्ये शेअर केलेत. आपले गुगलमधले सहकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्याबरोबर झालेल्या मुलाखतीचा फोटोही त्यांनी पोस्ट केलाय. या सगळ्यांचे यशस्वी भारत दौऱ्यासाठी त्यांनी आभार मानलेत.    

गुगल मीटमधल्या कार्यक्रमात सुंदर पिचाई यांनी गुगल कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करू पाहत असलेल्या विस्ताराबद्दलही माहिती दिली. डॉक्टरने केलेल्या वैद्यकीय निदानानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून यंत्र पुढचे उपचार कसे सोपे करू शकतो, हे त्यांनी विशद करून सांगितलं. तर कृषि, शिक्षण, आरोग्य आणि अशा इतरही क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल विकसित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.    

आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी त्यांना भारताकडून सहकार्य हवं आहे.