Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : ट्विंकल खन्ना यांनी पिचाईंना विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्यातलं स्थान

Twinkle Khanna

Image Source : www.twitter.com

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई ट्विंकल खन्नांशी बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर काय म्हणाले?

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांना यावेळी ख्रिस्मसची भेट (Christmas Gift) वेळे आधीच मिळाली. म्हणजे त्यांनीच तसं आपल्या ट्विटर हँडलवर (Twitter Handle) कबूल केलंय. गुगलचे (Google CEO) सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची प्रगट मुलाखत ही आपल्याला मिळालेली नाताळची भेटच होतं, असं खन्ना यांनी म्हटलंय. पिचाई यांच्या मुलाखतीतून आपण तीन गोष्टी शिकलो असं खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram Post) लिहिलंय. आणि या तीन गोष्टी आहेत,       

जागतिक स्तरावर काम करताना भारतीय असल्याचा फायदा, पाय कायम जमिनीवर राहावेत यासाठी पिचाई काय करतात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) येणाऱ्या वर्षांमध्ये काय बदल घडवून आणणार आहे!      

ट्विंकल खन्ना यांनी पिचाई यांची घेतलेली ही मुलाखत अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पण, ट्विंकल यांनी इन्स्टाग्रामवर काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला मदत करण्यासाठीच वापरली जाईल हा पिचाई यांचा आशावाद त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे.      

बुद्धिबळ हा खेळ आपण दोन खेळाडूंमध्ये खेळू शकतो तसाच माणूस संगणकाबरोबरही खेळू शकतो. संगणक माणसापेक्षा चांगलं बुद्धिबळ खेळतात हे आता सिद्ध झालं आहे. अशावेळी संगणकाची मदत घेतली तर माणूसही चांगलं बुद्धिबळ खेळायला शिकेल. हे उदाहरण पिचाई यांनी ट्विंकल खन्ना यांना दिलं आहे.       

म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाला मदत करण्यासाठी पूरक म्हणून काम करेल. माणसाची जागा घेईल असं पिचाई यांना वाटत नाही, असं खन्ना म्हणाल्या.       

मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाल्यापासून प्रत्येकच क्षेत्रात ते माणसाला मदत करतील, असाही पिचाई यांना विश्वास आहे. वैद्यकीय क्षेत्रात योग्य निदान करणं, शैक्षणिक क्षेत्रात अचूक माहिती देणं, अशी सगळी कामं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उत्पादनं देतील, असं पिचाई मुलाखतीत म्हणाले. अगदी सर्जनशील क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होईल, असं त्यांचं मत आहे.       

सुंदर पिचाई यांनी आपल्या भारत दौऱ्यात गुगल फॉर इंडिया 2022 या कार्यक्रमातही भाग घेतला. आणि गुगल कंपनीच्या आगामी योजना लोकांना समजावून सांगितल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान पिचाई यांनी तंत्रज्ञानातील अत्याधुनिक प्रयोग तसंच गुगलवर अलीकडच्या काळात भारतात लागलेला दंड यावरही चर्चा केली. मोदी यांनी त्यांच्या भेटीविषयी ट्विटही केलं आहे.      

‘सुंदर पिचाई यांच्याशी बोलून छान वाटलं. तंत्रज्ञान, नवीन शोध यावर आम्ही चर्चा केली. मानवी प्रगती आणि सातत्यपूर्ण विकास यासाठी तंत्रज्ञान कसं मदत करू शकतं यावर आम्ही चर्चा केली. आणि या उद्दिष्टासाठी जग एकत्र येईल अशी मला आशा वाटते.’ असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.       

सुंदर पिचाई यांनीही G20 परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारताला शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात परिषदेला सहकार्य करण्याचं वचनही दिलं. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच पिचाई यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली.