Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sundar Pichai India Visit : गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई भारत दौऱ्यात काय काय करणार?    

sundar pichai

Image Source : www.britannica.com

गुगल या तंत्रज्ञानविषयक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येतायत. गुगल पिक्सल फोनची निर्मिती भारतात होईल का, आणि गुगलवर अलीकडेच CCI ने लावलेला कोट्यवधींचा दंड माफ होईल का या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या अजेंडावर असतील.

टेक जायंट कंपनी गुगलसाठी दक्षिण आशियाई देश आणि त्यातही भारत ही मोठी बाजारपेठ आहे. आता पुढच्या टप्प्यात कंपनीला देशाबरोबरचे संबंध आणखी दृढ करायचे आहेत. त्यासाठी गुगल कंपनीने त्यांच्या पिक्सेल फोनचं उत्पादन भारतात करण्याची तयारी दर्शवली आहे.  

कंपनीचे कार्यकारी अधिकारी पुढच्या आठवड्यात भारतात येतील तेव्हा हा विषय अजेंड्यावर सगळ्यात पुढे असेल. गुगलने अलीकडेच भारतात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यानंतरच सुंदर पिचाई यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला. आता ही गुंतवणूक कुठल्या स्वरुपात असेल यावर पिचाई यांच्या दौऱ्यात शिक्कामोर्तब अपेक्षित आहेत.  

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात भारताला उतरायचं आहे. चीन अजून कोव्हिड परिस्थितीतून पुरता सावरेला नाही. अशावेळी भारताला मोबाईल फोन आणि सेमी कन्डक्टर चिप उत्पादनाच्या उद्योगात मोठी संधी दिसते आहे. आयफोनचं उत्पादन भारतात व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे गुगल कंपनीच्या पिक्सेल फोनची निर्मिती करण्यातही भारताने इच्छा प्रदर्शित केली आहे.   

केंद्रसरकारच्या ‘मेक इन इंडिया’ तसंच PLI (Production Linked Incentive) योजनांअंतर्गत पिक्सेल फोनच्या निर्मितीचा प्रस्ताव पूर्वीच गुगल समोर ठेवण्यात आला आहे.  

या व्यतिरिक्त पिचाई यांच्या अजेंडावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.  

भारत ही गुगलसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. पण, अलीकडच्या एका वर्षात, द काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) कंपनीवर एकाच आठवड्यात दोनदा मोठा दंड लावला. इंटरनेट कंपन्यांवर प्रसिद्ध होणारा मजकूर आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कंपन्या वापरत असलेल्या युक्त्या यावर लक्ष ठेवण्याचं काम CCI ही संस्था करते. ही सरकारी नियामक संस्था आहे.  

या संस्थेनं गुगल कंपनीवर तब्बल 944 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांमुळे गुगलची सेवाही भारतात विस्कळीत झाली होती. गुगल कंपनीच्या प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध करून देण्याविषयीचं धोरण सर्वसमावेशक नसल्याचा ठपका CCI ने ठेवला होता.  

अशाच प्रकारची कारवाई CCI ने अँड्रॉई़ड फोन यंत्रणेवर करताना गुगलवर आणखी एकदा 1,113 कोटी रुपयांचा दावा ठोकला. गुगल कंपनीचं त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी सुंदर पिचाई यांना भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्नही सोडवायचा आहे. गुगल वापरणाऱ्या लोकांची  सुरक्षितता आणि गुगलच्या कार्यपद्धतीबद्दल सरकारमध्ये विश्वास निर्माण करणं हा पिचाई यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असेल.  

सुंदर पिचाई भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. त्यांचा जन्मही भारतातल्या मदुराई इथं झाला आहे. IITच्या खरगपूर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आहे. ‘आपण जगात कुठेही गेलो, तरी आपल्याबरोबर भारताचा एक अंश ह्रदयात असतोच,’ असं पिचाई यांनी अलीकडेच म्हटलं होतं. तेव्हा त्यांच्या भारत दौऱ्याचं नियोजन सुरू होतं.