आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर सरकारच्या अनेक गुंतवणूक योजना आहेत. सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या त्यापैकीच एक. विशेष म्हणजे या सरकारी योजना असल्याने यातील गुंतवणूक ही सुरक्षित आहे. या दोन्ही योजनांचा गुंतवणूक कालावधी हा 15 वर्षाचा आहे. असे असले तरी यातून मिळणारा परतावा हा वेगवेगळा आहे. याच्या मागील नेमके कारण काय? या दोन्ही योजनांमध्ये फरक काय? जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक कार्यकाळ किती?
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक 15 वर्ष सलग करावी लागते. त्यानंतर 5 वर्षाचा वेटिंग पिरिअड देण्यात येतो. या काळात गुंतवणूक करावी लागत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत देखील ग्राहकांना व्याजदर मिळतो. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 21 वर्षांनंतर यातील पैसे त्या मुलीला मिळतात. या खात्यातील पैसे पालक मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणासाठी काढू शकतात. मुलीच्या शिक्षणासाठी पालक एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढू शकतात.
पीपीएफ खात्यात कोणीही गुंतवणूक करू शकतो. याचा गुंतवणूक कालावधीदेखील 15 वर्षाचा आहे. मात्र यामध्ये 15 वर्ष पूर्ण होताच पैसे काढता येतात. त्यानंतर प्रत्येकी 5 वर्षानुसार पीपीएफ खात्यात गुंतवणूक करता येते. जर तुम्हालाही या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस किंवा बँकांशी संपर्क करावा लागेल.
व्याजदर किती मिळतो?
सुकन्या समृद्धी योजनेत नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना 8% व्याजदर दिला जात आहे. तर पीपीएफ खात्यावरील गुंतवणुकीवर सध्या ग्राहकांना 7.10% व्याज दिले जात आहे. या दोन्ही योजनांवरील व्याजदरात सरकार वाढ किंवा कमी करू शकते.
किमान आणि कमाल गुंतवणूक जाणून घ्या?
सुकन्या समृद्धी योजनेत पालक मुलीच्या नावे किमान 250 रुपये तर कमाल 1. 50 लाख रुपये वार्षिक आधारावर गुंतवू शकतात. पीपीएफमध्ये देखील ग्राहकांना किमान 500 रुपये ते कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते.
कर सवलत मिळते का?
सुकन्या समृद्धी योजनेत 1.50 लाखांच्या वार्षिक गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलतीचा लाभ घेता येतो. इन्कम टॅक्स कायद्यातील 1961 अनुसार कलम 80C अंतर्गत हा लाभ घेता येतो.
पीपीएफमध्ये केलेली वार्षिक 1.50 लाखांच्या गुंतवणुकीतून ग्राहकांना कर सवलत मिळते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत याचा लाभ घेता येतो. या दोन्ही योजना EEE प्रवर्गातील आहेत.
या योजनांमागील गणित समजून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेत पालकांनी मुलीच्या नावे वर्षाला 1.50 लाख रुपयांची 15 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर 21 वर्षानंतर पालकांना मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी सुमारे 60 लाखाहून अधिक रक्कम मिळेल. हेच पैसे पीपीएफ खात्यात गुंतवल्यानंतर ग्राहकांना 15 वर्षानंतर 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळतील.