Sovereign Gold Bond Scheme August 2022 Price : जर तुम्ही आगामी सणासुदीच्या हंगामात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा नक्कीच विचार करू शकता. अशाप्रकारे सोन्यामध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग उपलब्ध आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड स्कीम 2022-23 मधील दुसऱ्या टप्प्याच्या तारखा आणि किमती जाहीर केल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी (दि. 19 ऑगस्ट 2022) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन एसजीबी (Sovereign Gold Bond-SGB) ऑफरची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 5197 रुपये आहे. जून 2022 मध्ये जाहीर केलेल्या किमतीपेक्षा आताची किंमत 106 रुपयांनी जास्त आहे.
सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड 2022-23चा दुसरा टप्पा 22 ते 26 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ओपन होणार आहे. तर याची सेटलमेंट डेट 30 ऑगस्ट, 2022 आहे. 22 ते 26 ऑगस्ट या कालावधीत खरेदीदारांना एसजीबी प्रति ग्रॅम 5,197 रुपयांना मिळणार आहे. जून, 2022 मध्ये आलेल्या पहिल्या टप्प्यात बॉण्डची किंमत 5091 रुपये प्रति ग्रॅम होती, जी आताच्या किमतीपेक्षा 106 रुपयांनी कमी होती.
Table of contents [Show]
50 रुपयांची सवलत!
एसजीबीच्या ऑनलाईन सबस्क्रिप्शन आणि पेमेंटवर 50 रुपयांची सवलती देण्यात आली. म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉण्डची ऑनलाईन खरेदी तुम्हाला फक्त 5147 रुपये प्रति ग्रॅमने मिळू शकते. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ल्याने ऑनलाईन गुंतवणूकदार आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांसाठी प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्यांना गोल्ड बॉण्डची किंमत प्रति ग्रॅम सोन्यामागे 5,147 रुपये असणार आहे.
गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या तारखा!
सॉव्हरीन गोल्ड बॉण्डचा (एसजीबी) दुसरा टप्पा 22 ते 26 ऑगस्ट या दरम्यान खुला असणार आहे आणि बॉण्ड जारी करण्याची प्रक्रिया 30 ऑगस्ट रोजी होईल.
India@75 : Price of Gold- आर्थिक संकटात भारताला तारणारं सोनं किती पटीने महागलं?
गुंतवणूक करावी का?
तज्ज्ञांच्या मते, गोल्ड बॉण्ड (SGB) हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला मार्ग असून, यामुळे लिक्विडिटी मिळते. तसेच याच्या सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. तसेच प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे.
गोल्ड बॉण्ड गुंतवणुकीला जोरदार प्रतिसाद
आरबीआयने नोव्हेंबर, 2015 पासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा केली. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोप्पं आहे. आयएनआरच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत सोन्याचे दर वर्षाकाठी सुमारे 8 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी सोन्यातील गुंतवणुकीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
गोल्ड बॉण्ड योजना काय आहे?
गोल्ड बॉण्ड योजना ही सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना (Sovereign gold bond scheme) सुरु केली. गोल्ड बॉण्ड्स सरकारच्यावतीने RBI जारी करते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे जारी केले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीवर आधारित असते.
अशी करा गुंतवणूक
गोल्ड बॉण्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. यामध्ये बँक शाखा, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन ऑफ इंडियाद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. यासाठी अर्ज भरल्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात आणि हे बॉण्ड तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात.
गोल्ड बॉण्डचा मॅच्युरिटी पिरिअड काय?
गोल्ड बॉण्डचा Maturity Period आठ वर्षाचा असतो. परंतु गुंतवणूकदारांना पाच वर्षानंतर यामधून बाहेर पडण्याची संधी मिळते. तसेच एखाद्याला यात गुंतवणूक केलेले पैसे काढायचे असतील तर ते पाच वर्षानंतर काढता येतात.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि विशेषकरून सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजना (Sovereign Gold Bond Scheme) ही एक चांगली संधी ठरू शकते.