सोनं म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण. या मौल्यवान धातूने भारतीयांना भुरळ घातली नसेल तर नवलच. आकडे सांगतात की भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात असलेलं सोनं 25000 ते 30000 टन इतकं आहे. सोनं खरेदीमध्ये भारत हा जगातील दुसरा मोठा ग्राहक आहे. भारतीयांची सोने खरेदी हौस पूर्ण करण्यासाठी भारतात दरवर्षी सरासरी 800 ते 1000 टन सोनं आयात केले जाते.
आज सोन्याचा भाव 50,000 रुपयांवर गेला असला तरी 1947 साली प्रती 10 ग्रॅम सोन्याचा भाव 88.62 रुपये इतका होता. अर्थात तेव्हा एक रुपया देखील सामान्य भारतीयांसाठी महागच होता. सात दशकांत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत गेली, याचे कारण आर्थिक संकटात उपयोगी पडणारा हक्काचा मौल्यवान धातू म्हणून सोने लोकप्रिय होऊ लागले होते.
1974 मध्ये सोन्याच्या किंमतींनी प्रथमच 500 रुपयांचा टप्पा ओलांडला. 1980 मध्ये 1,000 रुपये, 1985 मध्ये 2,000 रुपयांवर सोन्याचा भाव गेला. 1996 मध्ये सोन्याने थेट 5,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. पुढे 2007 मध्ये 10,000 रुपये, 2018 मध्ये 30,000 रुपये आणि 2020 मध्ये सोने दराने 50,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. कोरोना संकटात सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर गेला. 75 वर्षांत सोन्याचा भाव 600 पटीने वाढला असला तरी सोन्याबद्दल भारतीयांचे आकर्षण तसूभर देखील कमी झालेले नाही.
सोन्याने वाचवली अर्थव्यवस्था!
दरम्यान, हेच सोनं भारतासाठी तारणहार ठरले होते. वर्ष 1991मध्ये जेव्हा देश आर्थिक संकटात फसला होता तेव्हा सरकारने 20 टन सोने यूबीएस (United Bank of Switzerland) या आंतरराष्ट्रीय बँकेला विक्री केले आणि त्यातून 240 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेतले होते. त्यानंतर तीनवेळा सोनं गहाण ठेवून बँक ऑफ इंग्लड आणि बँक ऑफ जपानकडून 400 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले. यासाठी 46.8 दशलक्ष टन सोनं गहाण ठेवावे लागले होते. आर्थिक उदारीकरणात घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांनी भारताची कवाडे जागतिक व्यापारासाठी खुली झाली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात सरकारने कर्जफेड करुन सोने बँकाकडून मुक्त केले.