भारतात साधारणपणे सोने ही गुंतवणुकीपेक्षा दाखवण्याची, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची किंवा मिरवण्याची गोष्ट झालीय. त्यामुळे सोने हे आपल्या घरात वस्तू किंवा दागिन्याच्या रुपातच असावे, असे बऱ्याच जणांना वाटते. ते बाँडच्या किंवा कॉईनच्या रूपात कशाला घ्यायचे? असा अनेकांचा प्रश्न असतो. आजही आपल्याकडे पेपर गोल्ड किंवा गोल्ड बॉण्ड्च्या परताव्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही. तसे पाहिले तर प्रत्यक्ष सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर ते घरातच राहतं. त्यावर व्याज ही मिळत नाही. उलट ते सांभाळण्याची जोखीम घ्यावी लागते. पण त्याऐवजी पेपर गोल्ड खरेदी केले तर किमान वर्षाला व्याज मिळते आणि गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहते.
पेपर गोल्ड म्हणजे काय?
सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स हे पेपर गोल्ड प्रकारात मोडते. यामध्ये कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्ही सोने खरेदी करता. बाजारपेठेतील सोन्याच्या दरांवर गोल्ड बॉण्डची किंमत अवलंबून असते. या गोल्ड बॉण्डसवर तुम्हाला व्याजही दिले जाते. या बॉण्ड्सचा मॅच्युरिटी पिरीयड आठ वर्षांचा असतो.
Information about Paper Gold purchase and benefits
प्रत्यक्ष सोन्याची किंवा सोन्याच्या दागिन्यांची फार काळजी घ्यावी लागते. ते चोरी होण्याची सतत मनात भीती असते. सोने घरात ठेवायला सुरक्षित वाटत नाही म्हणून मग लॉकरचा पर्याय वापरावा लागतो. त्यासाठी बॅंकेला वेगळे शुल्क द्यावे लागते. त्यात आता लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तुंचा विमा काढण्यासही सांगितले जाते. यासाठी पुन्हा खर्च. या सगळ्या सोपस्कारांऐवजी पेपर गोल्ड घ्यायया पर्याय सर्वांत किफायतशीर वाटतो.
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करताना ती विशिष्ट पद्धतीने आणि नियोजनपूर्वक करावी लागते. घरातील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पेपर गोल्ड हे जास्त परतावा देतात. बाजारपेठेवर नजर ठेवून योग्यवेळी हे सोने खरेदी करत राहिल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक कशी कराल?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस (sovereign gold bond)च्या माध्यमातून 1 ग्रॅम सोन्यापासून 4 किलो पर्यंत सॉव्हरिन बॉण्डस खरेदी करु शकता. डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना गोल्ड बॉण्डसच्या खरेदीत एका ग्रॅममागे काही रूपयांची सूट ही दिली जाते.
पेपर गोल्डमध्ये कोण किती गुंतवणूक करू शकतो?
सॉव्हरिन गोल्ड बॉण्डचा लाभ भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंब (HUF), विश्वस्त, विद्यापीठं आणि सेवाभावी संस्था घेऊ शकतात. एक व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब 4 किलोपर्यंत सोन्याचे बॉण्ड्स खरेदी करू शकतात, तर ट्रस्टना 20 किलोपर्यंतची मर्यादा आहे.
कोणाकडून बॉण्ड्स खरेदी करता येईल?
रिझर्व्ह बँकेने नेमक्याच संस्थांना, विभागांना या सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स योजनेच्या अंमलबजावणीची आणि प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे. यात राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड खासगी बँका, शेड्युल्ड परदेशी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत स्टॉक एक्सचेंजमधूनही बॉण्ड्सची खरेदी करता येते.