2022-23 चा इन्कम टॅक्स रिटर्न (income tax return) भरण्याचा इशारा एव्हाना अनेक कर्मचाऱ्यांना मेल, एसएमएसद्वारे मिळालेला आहे. याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर पगारदारांची धावपळ होते ती कर वाचविण्यासाठीच्या गुंतवणूक (investment) पर्यायाची. ती अनेक मार्गांनी कमी करता येऊ शकते. गुंतवणूक करताना नेमके काय करावे हे ठरवताना गोंधळ उडू शकतो. गुंतवणूक ही आयुष्यभराची एक उत्तम सवय आहे. मात्र ती सवय लावून घेताना काही महत्वाचे घटक आपण लक्षात ठेवणं आवश्यक असतं. हे महत्वाचे घटक आपण समजून घेणे आपल्या हिताचे ठरू शकतात. अशा निवडक सहा महत्त्वाच्या घटकांची माहिती आपण येथे करून घेऊयात.
गुंतवणूक सल्लागार
गुंतवणूक करताना गुंतवणुकीसाठी प्रमाणित तज्ज्ञ सल्लागारांचा (financial advisors, financial planner) सल्ला अवश्य घेतला पाहिजे. आपली कमाई (income) आणि आपल्या आयुष्याची आखणी (planning) यानुसार योग्य सल्ला मिळण्यासाठी ते आवश्यक आहे. सल्लागारांना विविध गुंतवणूक साधनांचा अभ्यास असतो. प्रचलित काळात त्यापैकी कोणती साधने कशी प्रतिसाद (performance) देत आहेत हे त्याना ठाऊक असतं. त्यामुळे अभ्यास करून स्वतःसाठी चौकट आखून त्या शिस्तीत केलेली गुंतवणूक कामी येऊ शकते. अशा गुंतवणुकीत सुरक्षिततता आणि वाढ अशा दोन्ही पातळ्यांवर ठरवलेली उद्दीष्टे साध्य होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ
सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत - अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण अधिकतर गुंतवणुकीबाबत वापरली जाते. ते खरंच आहे म्हणा. सर्वाधिक परतावा (return) देणारा आणि तुलनेत जोखीम (risk) कमी करणारा गुंतवणुकीचा मार्ग आपल्याला दिसतो. आपल्याला वाटतं सगळी गुंतवणूक त्यातच करावी ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ होईल. उगाच इतर कमी रिटर्न देणाऱ्या पर्यायाकडे कशाला पहायचं? मात्र असा विचार चुकीचा ठरू शकतो. कारण गुंतवणुकीच्या प्रत्येक क्षेत्रात चढ-उतार (volatility) होत असतात. त्यामुळे गुंतवणुकीचा डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओ (portfolio) तयार करून त्या पद्धतीने गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ मंडळी देतात.
पारंपरिक साधने
आजही अनेक जण गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या गेलेल्या पारंपरिक साधनांना (options) पसंती देतात, तसेच त्या पलीकडे पाहणेही टाळतात. उदाहरणार्थ, पोस्टाच्या योजनांतील गुंतवणूक, राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील मुदत ठेवी (deposit) अशी गुंतवणुकीची साधने अधिक सुरक्षित मानली जातात. अपारंपरिक साधनांचा (instruments) वापर किती प्रमाणात केला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. रिस्क आणि रिटर्न्स सोबतच चालत असतात असं म्हटलं जातं. पारंपरिक साधने ही महत्वाची आहेतच. मात्र त्यापलीकडे जाऊन गुंतवणुकीची नव्या साधनांचा सतत शोध घेत राहणं आवश्यक असतं, असं तज्ज्ञ नमूद करतात.
चक्रवाढीची शक्ती
गुंतवणुकीच्या क्षेत्रात चक्रवाढीची शक्ती (Power of compounding) याचा उल्लेख नेहमी केला जातो. आपण गुंतवलेली रक्कम (amount) काळानुसार अधिकाधिक वाढत जाऊ शकते. कारण आपण व्याज काढून घेतले (withdraw) नाही आणि ठराविक मुदतीनंतर ते व्याजही मूळ मुदलात जमा केले तर ती रक्कम वाढत जाते. ही चक्रवाढीची शक्ती अनेक दशके गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फार मोठे रिटर्न्स देऊ शकतात. त्यामुळे अनेकदा गुंतवणुकीला वयाच्या लहान वयातच सुरुवात करावी, असा सल्ला तज्ज्ञांमार्फत दिला जातो. त्यामुळे निवृत्तीपर्यंतच्या (retirement) वयात ही चक्रवाढीची शक्ती अधिक लाभ मिळवून देते, असंही दिसून येतं.
झटपट फायद्याचा मोह
झटपट किंवा अत्यंत कमी वेळेत होणाऱ्या फायद्याचा मोह अनेक गुंतवणुकदारांना सहज पडतो असं दिसतं. मोठ्या रिटर्नच्या मोहाने स्वतःची गंगाजळी (capital) कुठल्या तरी फसव्या योजनेत गुंतवली आणि लाभ तर दूरच, पण ती मुद्दलही गमावून बसण्याची वेळ आली असं होऊ शकतं. अशी प्रकरणं आणि त्यात नुकसान झालेल्या गुंतवणुकदारांच्या सत्यकथा-अनुभव आपण अनेकदा एकत असतो. अल्पावधीत मोठ्या फायद्याचे आमिष टाळणे उत्तम. हे इतकं साधं तत्त्व आहे की ते सांगण्यासाठी खरं तर कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता पडू नये.
स्वयं ‘निरंतर शिक्षण’
इथे शिक्षण याचा अर्थ एखाद्या कोर्सचे किवा कॉलेज युनिव्हर्सिटीत एखादा अभ्यासक्रम करणं असा अपेक्षित नाही. गुंतवणुकीच्या क्षेत्रात काय घडतंय याची माहिती असल्यास त्याचा उपयोग होऊ होतो. गुंतवणूकदारांसाठी लेख किंवा पुस्तके लिहिली जातात. व्याख्यानं किंवा कार्यशाळा आदी आयोजित केल्या जातात. यात जमेल तितके वाचन आणि सहभाग घेणे, शेअर केली जाणारी माहिती आणि दृष्टीकोन ऐकून घेणे यातून आपली गुंतवणूकविषयक घडण पक्की होत जाते. याचा निर्णय घेण्याच्या वेळी लाभ होऊ शकतो.
गुंतवणुकीबाबतच्या लेखनाला, वाचनाला मर्यादा असली तरी आपले गुंतवणूकविषयक शिक्षण सातत्याने वेगवेगळ्या मार्गांनी सुरू ठेवणं योग्य ठरतं. त्याला आणि त्याबाबतच्या ज्ञान आत्मसात करण्यास निश्चितच मर्यादा असू नये!