इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ELSS) हा एक म्युच्युअल फंडाचाच प्रकार आहे. ईएलएसएस मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वजावटीचा लाभ मिळतो. या फंडमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन पीरिअड असतो. इतर टॅक्स सेव्हिंग्जच्या योजनांच्या तुलनेत हा कालावधी कमी आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण म्युच्युअल फंड असून तो कर बचतीसह दीर्घकालीन गुंतवणुकीवर तो चांगले रिटर्न देतो.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ELSS) ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये
सर्वात कमी लॉक-इन
बँकेतील मुदत ठेवी आणि पोस्टाच्या योजनांसाठी 5 वर्षे तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी 15 वर्षांचा लॉक-इन पीरिअड आहे. या तुलनेत ELSS मध्ये फक्त 3 वर्षांचा (कलम 80C गुंतवणूक पर्यायांपैकी) सर्वात कमी लॉक-इन कालावधी आहे. ELSS मधील नफ्यावर दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून कर आकारला जातो. 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी संपण्याआधी तुम्ही या फंडातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर शार्टटर्म साठी पैसे गुंतवण्यास इच्छुक असाल तर ELSS फंड तुमच्यासाठी नाही.
सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP)
एकदम पैसे गुंतवणूक करण्यासोबतच, ELSS मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील आहे. यात किमान 500 रूपयांनी गुंतवणूक सुरू करता येते. यामुळे गुंतवणूकदारास आर्थिक शिस्त लागण्यास मदत होते. तसेच ऐनवेळी टॅक्स वाचवण्यासाठी एकरकमी पैसे गुंतवणुकीची सवय मोडण्यास मदत होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे, SIP चा प्रत्येक भाग गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी लॉक असतो.
उच्च परतावा (High Return)
ELSS फंड दीर्घ मुदतीसाठी चांगला परतावा देऊ शकतात. बँकेच्या मुदत ठेवी (FD), पीपीएफ (PPF) आणि पेन्शनसारख्या इतर पारंपारिक योजनांपेक्षा ईएलएसएस फंड अधिक परतावा देऊ शकतात. अर्थात, यासोबत उच्च जोखम ही लागू होते. त्यामुळे ज्यांना टॅक्स वाचवायचा आहे आणि इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ELSS एकदम परफेक्ट आहे.
80C मर्यादा
ELSS फंडमध्ये गुंतवणूक करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे आयकर कायद्याचे कलम 80C तुमच्या गुंतवणुकीमधून जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कपात करण्याची परवानगी देते. त्यामुळे तुमच्याकडे आधीपासूनच PPF, पोस्टाची बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, जीवन विमा यामध्ये 1.5 लाख रूपये गुंतवले असल्यास तुम्हाला ELSS साठी कर कपातीचा दावा करता येत नाही. पण तुम्ही ELSS मध्ये कितीही रक्कम गुंतवू शकता.
तुमची जोखीम घेण्याची पुरेशी तयारी असेल आणि इतर 80C गुंतवणूक पर्यायांमधून पैसे अधिक काळ लॉक करून ठेवण्यास तयार नसाल तर ELSS ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.