Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Likely to Continue Rate Hike : व्याजदर वाढ सुरुच राहणार, डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देणार

RBI Repo Rate Hike

Image Source : www.businesstoday.in

RBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमधील पतधोरणात व्याजदरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.5 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान बँकेची पतधोणर बैठक होणार आहे.महागाईचा दर अजूनही हाताबाहेर असल्याने बँकेला पुन्हा एकदा कठोर पतधोरण राबवावे लागेल. RBI कडून रेपो दरात 0.35% ते 0.50% वाढ केली जाण्याची शक्यता आहे.सध्या रेपो दर  5.90% आहे. त्यात गेल्या पतधोरणात 30  सप्टेंबर रोजी 0.50% वाढ करण्यात आली होती. मे 2022 महिन्यापासून रेपो दर वाढवला आहे.  

महागाई, निर्यात, वित्तीय तूट यांची ताजी आकडेवारी बँकेची चिंता वाढवणारी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये महागाईचा दर  6.77% इतका होता. सप्टेंबर महिन्यात महागाई  7.41% इतका वाढला होता.रिझर्व्ह बँकेने महागाईचे उद्दिष्ट 6% ठेवले आहे.मात्र मागील 10 महिन्यात महागाईचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे आरबीआयवरील दबाव वाढला आहे. पतधोरण बैठकीत किरकोळ महागाई दराचा मुद्दा महत्वाचा असतो.नोव्हेंबरच्या सुरुवातीला बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक पार पडली होती.

महागाईशिवाय बँकेसमोर रुपयाला स्थैर्य मिळवून देण्याचे आव्हान आहे. चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाचे प्रचंड अवमूल्यन झाले आहे. रुपयाने डॉलरसमोर 82 ची पातळी गाठली होती. रुपयातील पडझड रोखण्यासाठी आरबीआयला मोठ्या प्रमाणात डॉलर्स खर्च करावे लागले होते. जागतिक पातळीवरील मंदीचा ट्रेंड पाहता दुसऱ्या तिमाहीत विकास दर कमी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी 6.5% पर्यंत मर्यादित राहील, असा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे.  

फेडरल रिझर्व्हची दरवाढ

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी 2 नोव्हेंबर 2022 प्रमुख व्याजदरात 0.75% वाढ केली.सलग चौथ्यांदा फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करत कर्जदारांना झटका दिला. फेडरल रिझर्व्हचा व्याजदर आता 3.75% ते 4% इतका झाला आहे. मात्र महागाई नियंत्रणात आली तर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचे वेग कमी करेल, असे संकेत बँकेने यावेळी दिले. 2008 मधील जागतिक महामंदीनंतर प्रथमच फेडरल रिझर्व्हचा व्याजदर 4% वर पोहोचला आहे. फेडरल रिझर्व्हची महागाई नियंत्रणासाठीची कठोर भूमिका आरबीआयकडून फॉलो केली जाऊ शकते.