अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी 2 नोव्हेंबर 2022 प्रमुख व्याजदरात 0.75% वाढ केली.सलग चौथ्यांदा फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करत कर्जदारांना झटका दिला. फेडरल रिझर्व्हचा व्याजदर आता 3.75% ते 4% इतका झाला आहे. मात्र महागाई नियंत्रणात आली तर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचे वेग कमी करेल, असे संकेत बँकेने यावेळी दिले. 2008 मधील जागतिक महामंदीनंतर प्रथमच फेडरल रिझर्व्हचा व्याजदर 4% वर पोहोचला आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी महागाई नवं संकट बनली आहे.कोरोना संकटातून सावरणारी अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत सापडेल,अशी भीती व्यक्त होत आहे. त्यातच अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रेसिडेंशिअल इलेक्शन कॅम्पेनला सुरुवात झाली असून विरोधकांनी प्रचारात महागाईचा मुद्दा उचलून धरला आहे. ज्यामुळे अमेरिकेत महागाई नियंत्रणासाठी फेडरल रिझर्व्हवरील दबाव वाढला आहे.
मागील महिन्यात जॉब मार्केटमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. त्याशिवाय हाऊसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे फेडरलने व्याजदर वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सांगितले. महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे. उच्चांकी महागाईचा हा शेवटचा टप्पा असेल, असा अंदाज पॉवेल यांनी व्यक्त केला.
पतधोरण कठोर केल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. मात्र दिर्घकाळात महागाईचा दर 2% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार बँक वेळोवेळी निर्णय घेईल, असे पॉवेल म्हणाले.फेडरल रिझर्व्हच्या 12 सदस्यांनी एकमुखाने 0.75% व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला.यानंतर दोन वर्ष मुदतीच्या ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण दिसून आली.अमेरिकन शेअर मार्केटमध्ये तेजी होती तर डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाली.
अमेरिकेला आणखी तीन वर्ष महागाईशी सामना करावा लागेल, असे पॉवेल यांनी यापूर्वीच्या बैठकीत म्हटले होते.वर्ष 2025 अखेर महागाईचा दर 2% पर्यंत खाली येईल, असा अंदाज 'फेडरल'ने व्यक्त केला.2022 च्या चौथ्या तिमाहीत महागाई 5.4% पर्यंत वाढेल, असे भाकीत बँकेने व्यक्त केले.फेडरल रिझर्व्हची पुढील बैठक 13 आणि 14 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक फेडरल रिझर्व्हचे अनुकरण करणार?
आज 3 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे. महागाई नियंत्रणाबाबत आरबीआय बोर्डाची ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील सेंट्रल बँकांच्या पतधोरणानुसार रिझर्व्ह बँक देखील आपली धोरणे आखते. फेडरलने चौथ्यांदा व्याजदर वाढवल्याने आता रिझर्व्ह बँक देखील अशाच प्रकारे व्याजदर वाढवण्याची भूमिका घेईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे. तसे झाले तर कर्जदारांना झटका मिळण्याची शक्यता आहे. आरबीआयने आतापर्यंत व्याजदरात 1.90% वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 5.90% इतका आहे. त्यानंतर बँकांनी कर्जदरात मोठी वाढ केली आहे.