रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अदानी समूहाला भारतीय बँकांनी दिलेल्या कर्जाबाबत महत्वाचे विधान केले आहे. गव्हर्नर दास म्हणाले की भारतीय बँका मजबूत आहेत. त्यामुळे या प्रकरणात चिंता करण्याची आवश्यकता नाही. (RBI Governor Shaktikanta Das said Indian Banks continues to be strong and their exposure to the crisis-ridden Adani group was not a cause for major concern)
अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग या संस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अदानी समूहात आतापर्यंत झालेली गुंतवणूक आणि अदानी समूहाला दिलेली कर्जे यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी नुकताच काही बँकांची कर्जे फेडली होती. अदानी समूहाला आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी सुमारे 38% कर्ज भारतीय बँकांनी दिले आहे.
अदानी समूहाच्या आर्थिक परिस्थितीबाबत हिंडेनबर्ग समूहाचा अहवाल समोर आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. अदानी समूहाती सातही शेअर्सच्या किंमतीत मागील दोन आठवडे प्रचंड घसरण सुरु आहे. अदानी समूहाला 10 अब्ज डॉलर्सचा आर्थिक फटका बसला आहे.
अदानी समूहाला भारतातील काही बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्थांनी कर्ज दिले आहे. भारतीय बँका आणि वित्त संस्थाची पाळेमुळे मजबूत आहेत. अदानी समूहाला बँकांनी दिलेल्या कर्जाची चिंता करायची गरज नाही, असे गव्हर्नर दास यांनी सांगितले. बँकांची आर्थिक बाजू भक्कम राहण्यासाठी मागील तीन ते चार वर्षांत रिझर्व्ह बँकेने अनेक पावले उचलली असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.
बँकांची कठोर नियमावली
बँकांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेची पारदर्शक नियमावली आहे. इतकेच काय तर बँकांमधील ऑडिट कमिटीसाठी देखील नियमावली आहे. बँकांना मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) ची नियुक्ती करणे बंधनकारक आहे, असे दास यांनी सांगितले.