Steel Price Hike: बांधकामासह विविध व्यवसायांसाठी लागणारं स्टील येत्या काही दिवसांत महाग होण्याची शक्यता आहे. परदेशातून आयात होणाऱ्या कोळशाच्या किंमती वाढल्याने स्टील उत्पादन कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक बाजारात दरवाढ पाहायला मिळू शकते.
टनामागे किती रुपये दरवाढ
अद्याप दरवाढ केली नसली तरी येत्या काही दिवसांत स्टील महाग होणार आहे. हजार किलो म्हणजेच एक टन स्टीलमागे सुमारे 4 हजार रुपये भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच किलोमागे 4 रुपये दरवाढ होऊ शकते. बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आधीच वाढल्या आहेत. नव्याने दरवाढ झाल्यास घर बांधणीचा खर्च आणखी वाढले.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आयात
ऑस्ट्रेलियाकडून भारत सर्वाधिक कुकिंग कोल आयात करतो. स्टील व्यवसायासाठी हा कोळसा अत्यावश्यक आहे. मागील काही दिवसांत ऑस्ट्रेलियातून आयात होणाऱ्या कोळशाच्या किंमती वाढून प्रति टन 350 डॉलर झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील खाणींमधून कमी उत्पादन, मंदावलेली पुरवठा साखळी, मेंटनन्स या गोष्टींमुळे ऑस्ट्रेलियात कोळशाच्या किंमती वाढल्या आहेत.
भारताला आयात होणाऱ्या कोळशात निम्मा वाटा ऑस्ट्रेलियाचा आहे. दरवर्षी 5.5 ते 6 कोटी टन कोळसा दरवर्षी आयात होतो. रशिया आणि अमेरिकेकडून सुद्धा भारत कोळशा आयात करतो. रशिया सर्वाधिक डिस्काउंट देत असल्याने येत्या काळात रशियाकडून होणारी कोळशाची आयात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांधकाम, वाहननिर्मिती सह अनेक क्षेत्रांना फटका
मागील काही दिवसांपासून दरवाढ झाल्याने कंपन्यांचा नफ्यातील वाटा कमी झाला आहे. त्यामुळे दरवाढ अटळ समजली जात आहे. पावसाळ्यानंतर घरांचे बांधकाम, पायाभूत सुविधा जसे की, रस्ते, पूल यांची कामे वाढतात. त्यामुळे विविध क्षेत्रांना महागाईचा फटका बसणार आहे. काही स्टील कंपन्यांनी 2 हजार रुपये टनामागे दरवाढ जाहीर केली आहे. तर काही कंपन्या भाव वाढवण्याच्या तयारीत आहेत.
वाहन निर्मितीमध्ये स्टील प्लेटचा वापर केला जातो. या स्टील प्लेटच्या किंमती वाढल्यास कारच्या किंमतीही वाढू शकतात. सणासुदीच्या काळात कंपन्यांकडूनही वाहन निर्मिती तेजीत आहे. त्यामुळे गाड्यांच्या किंमतीही वाढू शकतात.