डिजिटल पेमेंट क्षेत्रातील पेटीएम कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी स्टार्टअपवर लक्ष केंद्रीत केले आहे. स्टार्टअप्सची भांडवलाची गरज भागवण्यासाठी विजय शेखर शर्मा यांनी व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंड सुरु केला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि इलेक्ट्रिक व्हेइकल या श्रेणीतील स्टार्टअप्सला व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंडांतून अर्थसहाय्य केले जाणार आहे.
व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंड 20 कोटींचा असून त्यात 10 कोटींचे ग्रीन शू ऑप्शन देखील आहे. भारतात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्रात नव संशोधनातून तयार होणाऱ्या स्टार्टअप्सला या फंडातून अर्थसहाय्य केले जाणार आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना नव संकल्पनांमधून सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअप्सवर विजय शेखर शर्मा यांचे लक्ष आहे.
भारतीय स्टार्टअप्स क्षेत्राने आजवर अनेक स्टार्टअप्स उद्योजक जगाला दिले आहेत. भारतीयांमध्ये नाविन्यपूर्ण सेवा सुविधा निर्माण करण्याची क्षमता असल्याचे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. कृत्रिमबुद्धीमत्तेवर आधारित नव तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रचंड क्षमता भारतीयांमध्ये आहेत. त्यामुळे व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंडातून एआय आणि इलेक्ट्रिक व्हेइकलमधील नवउद्यमींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव उद्योजकांना आवश्यक ते भांडवल व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंडातून पुरवले जाणार आहे. यातून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित परिसंस्था तयार होईल. आत्मनिर्भर भारताची 10 लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास विजय शेखर शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंडात विजय शेखर शर्मा यांचे सर्वाधिक योगदान असेल. त्याशिवाय इतर गुंतवणूकदार देखील या फंडात सहभागी होणार आहेत. व्हीएसएस इन्व्हेस्टमेंट फंडाची मालकी विजय शेखर शर्मा यांच्याकडे असेल.
विजय शेखर शर्मा यांनी यापूर्वी ओला इलेक्ट्रिक, जोश टॉक्स, मेसा स्कुल, उन्नती, प्राण, गोक्यूआयआय, केडब्ल्यू बाइक्स, दालचिनी, ट्रिब्यु हॉटेल्स अशा स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.