पेमेंट बँक पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ने सुरिंदर चावला यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने रविवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मंजुरी मिळाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. आरबीआयने नवीन ग्राहक जोडण्यासाठी पीपीबीएलवर घातलेले निर्बंध कायम ठेवले आहेत.
सुरिंदर चावला हे अनुभवी बँकर आहेत. यापूर्वी चावला आरबीएल बँकेत शाखा बँकिंग प्रमुख म्हणून कार्यरत होते. पीबीबीएलचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी चावला यांचे कंपनीत स्वागत केले.मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.
सुरिंदर चावला यांना 28 वर्षाचा अनुभव
यापूर्वी चावला हे आरबीएल बँकेत शाखा बँकिंग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सुरिंदर चावला यांना रिटेल बँकिंगमध्ये 28 वर्षांचा अनुभव आहे. पेटीएमपूर्वी त्यांनी एचडीएफसी, आरबीएल, एबीएन आणि स्टँडर्ड चार्टर्ड सारख्या मोठ्या बँकांमध्ये काम केले आहे. आरबीएलच्या आधी, चावला यांनी एचडीएफसी बँकेत प्रमुख वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर जवळपास 12 वर्षे घालवली. याठिकाणी रिटेल लायबिलिटी प्रॉडक्ट्स ग्रुपचे प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली.
पीपीबीएलचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी चावला यांचे कंपनीत स्वागत केले. यावेळी पेटीएम पेमेंट्स बँक बोर्डाचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा सुरेंद्र चावला यांच्या नियुक्तीबद्दल म्हणाले, “सुरेंद्र यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्यांचा बँकिंगमधील समृद्ध अनुभव आणि भारतीय आर्थिक परिदृश्याची सखोल माहिती पेटीएम पेमेंट्सला आणखी मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याच्या अनुभवाचा कंपनीला खूप फायदा होईल."