एका रविवारी एका घरातला मोबाईल फोन खणाणला.
एका आज्जीबाईंनी फोनला उत्तर दिलं.
समोरुन आवाज आला, ‘अभिनंदन! तुम्ही 40 दशलक्ष अमेरिकन डॉलरची लॉटरी जिंकली आहे!’
आज्जीबाई साठी पलीकडच्या होत्या. त्यांनी जग पाहिलेलं होतं. त्यामुळे या फोन कॉलची शंकाच त्यांना जास्त आली. कुणीतरी टाईमपास करत असेल म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.
काही वेळाने फोन पुन्हा वाजला.
यावेळी महिलेनं आज्जीबाईंना बोलणं नीट ऐकून घ्यायची विनंती केली. पण, संदेश पुन्हा तोच होता. महिला सांगत होती, ‘अभिनंदन! तुम्ही 40 दशलक्ष अमेरिकन डॉलरची लॉटरी जिंकली आहे.’
आता तर आज्जीबाईंना हा कुठला तरी घोटाळा वाटला. असे फोन करून आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना त्यांनी ऐकल्या होत्या. त्यांनी पुन्हा फोन बंद केला.
असं चक्क दिवसभर सुरू होतं. समोरून सांगण्यात येत होतं, ‘तुम्ही लॉटरी जिंकलीय.’ आणि आज्जीबाई घाबरुन फोन ठेवून दोत होत्या.
अखेर सोमवारी फोनवर एक गृहस्थ आले. त्यांनी,‘तुम्ही कधी लॉटरीचं तिकीट खरेदी केलंय का?’ इथपासून संभाषणाची सुरुवात केली. आणि मग उलगडा झाला देशाच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या लॉटरी बक्षिसाचा!
ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियातली. आणि आता या हुशार आज्जीबाईंना त्यांनीच लॉटरी जिंकल्याची खात्रीही पटलीय. उत्तर व्हिक्टोरिया राज्यातल्या इचुका गावातल्या या आज्जीबाई आहेत.
‘माझा खरंच फोनवर विश्वास बसला नव्हता. मला वाटलं काहीतरी ऑनलाईन घोटाळा असावा. मी शेजाऱ्यांनाही तसं सांगितलं. पण, जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी माझं तिकीट मागितलं, तेव्हा मला खात्री पटली. पण, तरीही विश्वास बसतच नव्हता. मी बधीर झाले होते.’ आज्जीबाईंनी युके स्टार वेबसाईटशी बोलताना सांगितलं.
आता आज्जीबाई ऑस्ट्रेलियातल्या स्टार झाल्या आहेत. पण, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.
सुरुवातीच्या फोन कॉलना त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिलं आणि घोटाळ्याविषयी जागरुकता दाखवली, त्याचंही कौतुक होतंय.
या लॉटरीचं नाव होतं द लॉट. आणि आज्जीबाईंने सगळे नंबर बरोबर आल्यामुळे त्या लॉटरीच्या एकमेव विजेत्या आहेत.
द लॉटच्या प्रवक्त्या अॅना हॉबडेल यांनी ब्रिटिश एजन्सीशी बोलताना सांगितलं की, ‘सुरुवातीला आजींचा विश्वास बसला नाही. पण, मी सगळे नंबर विचारून त्यांना खात्री पटवून दिली. ऑस्ट्रेलियातली ही सगळ्यात मोठी लॉटरी आहे. आणि 40 दशलक्ष डॉलरची अख्खी रक्कम आजींनाच मिळणार आहे.’
लॉटरीची रक्कम मात्र अजून आजींच्या खात्यात जमा झालेली नाही. पण, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करायचं याच्या योजना आखायला आजींनी सुरुवात केली आहे.