लॉटरीचं (Lottery) व्यसन चांगलं नाही असं म्हणतात. ते खरंच आहे. पण, कधी कधी गंमत म्हणून घेतलेली लॉटरी तुमच्यासाठी लकीही ठरू शकते. तसंच बेल्जिअममधल्या (Belgium) एका गावाचं झालंय. इथं अख्ख्या गावालाच लॉटरी (Lottery) लागलीय. हे शक्य झालं कारण, गावाने वर्गणी जमा करून एकच मोठ्या लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) घेतलं होतं. आणि ते लागल्यावर गावातल्या प्रत्येक कुटुंबाला जवळ जवळ 7 कोटी (RS 7 Crores) रुपये मिळणार आहेत.
बेल्जिअमचं हे छोटंसं गाव आणि अँटवर्प प्रांतातलं ऑलमन! इथल्या गावकऱ्यांनी एका लॉटरी एजंटकडून एकच तिकीट विकत घेतलं. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी 15 युरोज म्हणजे 1300 रुपये भरले. गावच्या सरपंचाने ही कल्पना लोकांना सुचवली. आणि मग पैसे जमा करून त्यांच्या नियोजनाचं कामही केलं. गावातली 165 कुटुंबं या योजनेत सहभागी झाली. फक्त एका ग्रामस्थाने लॉटरीला नकार दिला.
आणि गंमत म्हणजे गावाने विकत घेतलेल्या लॉटरी तिकिटासाठी प्रत्येक वर्गणीदाराला प्रत्येकी 7.47 कोटी रुपये मिळाले. पैसे वाटपाचं कामही सरपंचानेच केलं. त्यामुळे सध्या ऑलमन गावात जल्लोष सुरू आहे. आणि जगाच्या नकाशावरही या गावाची चांगलीच चर्चा होतेय. अगदी युके, जर्मनीपासून सगळ्याच देशातल्या वृत्तवाहिन्या गावात जाऊन शूटिंग करतायत.
गावकऱ्यांनी घेतलेली लॉटरी ही बेल्जिअम सरकारची लॉटरी होती. तिचं एकूण बक्षीस 12 अब्ज 41 लाख रुपये होतं. युरोमिलियन्स लॉटरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लॉटरीसाठी तब्बल 2 कोटी 70 लाख लोकांनी बुकिंग केलं होतं. पण, ऑलमनचे गावकरी चांगलेच नशीबवान ठरले. त्यांच्या लॉटरीवरचे सात नंबर लकी ठरले.
यापूर्वी एकत्रपणे लॉटरी जिंकल्याचं एक प्रकरण ऑस्ट्रेलियात घडलं होतं. इथं सात खाण कामगारांनी एकत्रपणे लॉटरी जिंकली. आणि त्यांना प्रत्येकी 21 कोटी रुपये मिळाले.