मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला अनेक लोक प्रवास करतात. यांत कामानिमित्त, नोकरीनिमित्त रोज प्रवास करणारे लोक देखील आहेत. तुलनेने ट्रेनचा प्रवास सोईस्कर असला तरी कन्फर्म सीट मिळणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई-पुणे हायवे मार्गे लोक प्रवास करतात. परंतु हा प्रवास देखील आता महागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे टोल दरात मोठी भाववाढ केली जाणार आहे.
टोल दरात होणार वाढ!
1 एप्रिलपासून मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वरील टोल दरात मोठी वाढ होणार आहे. यावेळी तब्बल 18% टोल दरवाढ होणार असल्याचे वृत्त आहे. Maharashtra State Road Development Corporation ने ही माहिती दिली आहे. दरवर्षी 6% टोल दरवाढ केली जाते आणि ती एकत्रितपणे दर तीन वर्षांनी लागू केली जाते. 2020 मध्ये मागील टोल दरवाढ झाली होती.
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या खाजगी वाहनांना 94 किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या 270 रुपये मोजावे लागतात. भाववाढ लागू झाल्यानंतर वाहन चालकांना याच मार्गासाठी 320 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच पुण्याहून मुंबईला जाताना आता अधिकचे 50 रुपये भरावे लागणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील अधिक 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
1 अप्रैल से लगेगा टोल का झटका #ekdarpan #network10 #Mumbai #Pune #expressway #tolls #rateincreases @CMOMaharashtra @msrtcofficial pic.twitter.com/bzal8fByQv
— Network10 (@Network10Update) March 28, 2023
खाजगी बस आणि टॅक्सीचे दर देखील वाढणार
मुंबई-पुणे मार्गावर मोठ्या संख्येने लोक प्रवास करत असल्यामुळे या मार्गावर खाजगी बस आणि टॅक्सी देखील धावतात. वाढत्या टोल दरांचा अतिरिक्त भार आता मात्र प्रवाशांवर पडणार आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे हैराण असलेले खासगी बस आणि टॅक्सी चालक प्रवाशांवर याचा बोझा टाकू शकतात.
लॉकडाऊनपासून हा व्यवसाय तसाही धीम्या गतीने सुरू आहे. सध्या ही खासगी वाहने मुंबई ते पुणे प्रवासासाठी 500 ते 550 रुपये आकारतात. टोल दरात वाढ झाल्यास प्रवाशांना 600-650 रुपये मोजावे लागू शकतात.
प्रवाशांचा मात्र नाराजीचा सूर
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. खासगी वाहनाने प्रवास करणारे यात्री आधीच पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतीने हैराण आहेत. आता टोलचे दर देखील वाढणार असल्यामुळे सामान्य प्रवाशांनी या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा अशी देखील मागणी केली आहे. सरसकट 18 टक्क्यांनी वाढ न करता टप्प्याटप्प्याने टोल दरवाढ करावी असा उपाय देखील काही प्रवाशांनी सुचवला आहे.