Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai City Travel : मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास दहा मिनिटांत  

Underground tunnel

Image Source : www.indiatoday.in

Mumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…

मुंबईत रस्त्यावरची रहदारी (Traffic Jam) हा नेहमीचा प्रश्न आहे. त्यामुळेच पूर्वेकडच्या उपनगरांमधून पश्चिमेला मरीन लाईन्सला (Marine Lines) जाण्यासाठी आता एक तास लागत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी एका भूमिगत बोगद्याची (Underground Tunnel) उभारणी सुरू झाली आहे. 6,500 कोटी रुपयांच्या या बोगद्यामुळे एक तासाचा प्रवास दहा मिनिटांवर येईल. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (MMRDA) या बोगद्याच्या कामासाठी निविदाही काढल्या आहेत.    

3.1 किलोमीटरचा हा बोगदा आहे. आणि यात दोन्ही बाजूंनी दोन - दोन मार्गिका असतील. जमिनीपासून 30 मीटर आत हा बोगदा असेल. मुंबई मेट्रोच्या ग्रँट रोड आणि गिरगाव स्थानकांच्या खालून हा बोगदा जाईल. आणि सरदार पटेल मार्गावरून हा बोगदा ईस्टर्न फ्रीवेपर्यंत येईल. ईस्टर्न फ्रीवे, कोस्टल रोड आणि मरीन ड्राईव्ह यांना जोडण्याचं काम हा बोगदा करेल. शहीद भगत सिंग मार्गावर होणारी नियमित वाहतूक कोंडी या बोगद्यामुळे कमी होईल. नवी मुंबईतल्या प्रस्तावित विमानतळाकडे जाणंही मुंबईकरांना सोपं जाईल असा अंदाज आहे.    

शहीद भगतसिंग मार्गावर येणाऱ्या रेल्वे स्थानकांमुळे तिथे फ्लायओव्हर किंवा उड्डाणपूल बांधणं MMRDA ला शक्य होत नाहीए. त्याला पर्याय म्हणून या भूमिगत मार्गाचं नियोजन करण्यात आलं आहे. सध्या या बोगद्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. कंत्राटाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्याच्या आधी सुरू करण्याचा MMRDA चा मानस आहे. आणि 2028 पर्यंत हे काम पूर्ण करून बोगदा कार्यान्वित करण्याची योजना आहे.    

याशिवाय मुंबईसाठीचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे कोस्टल रोडचा. यात मरीन लाईन्स ते पश्चिम उपनगर कांदिवली असा 29.2 किलोमीटरचा पट्टा अंतर्भूत आहे. यातला पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचं बांधकाम मुंबई महानगर पालिका करत आहे.     

तर MMRDA चा ट्रान्सहार्बर प्रकल्पही पूर्णत्वाच्या मार्गाला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतला प्रवास सोपा आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे.