Money Doubling Racket: वाढती महागाई आणि जगभर सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे सध्या पैसे जपून वापरण्याचा आणि आहे ती नोकरी सांभाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पैशांची सुरक्षित आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही जण पैसे दुप्पट करण्याच्या स्कीमचे आमिष दाखवून लोकांना लुबाडत आहेत. मुंबईत अशाच एका टोळीला मुंबई पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 लाख रुपयांची रोकडही जप्त केली आहे.
Table of contents [Show]
पैसे दुप्पट करून देण्याची मोड्स ऑपरेंडी!
या टोळीकडून काही जणांना हेरून टार्गेच केले जात होते. ज्यांना पैशांची अडचण आहे किंवा ज्यांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवायचे आहेत. अशा लोकांना या स्कीममध्ये अडकवले जात होते. जे या स्कीमसाठी तयार होतात. त्यांना वेगवेगळ्या योजना सांगून कमीतकमी वेळेत डबल किंवा जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. सुरूवातीला यांना छोटी रक्कम लगेच डबल करून दिली जात होती. त्यामुळे यांचा या टोळीवर विश्वास बसत होता. त्यामुळे काही लोकांनी आमिषाला बळी पडून मोठी रक्कम त्यांच्याकडे देण्यास सुरूवात केली. याचाच फायदा या टोळीने घेऊन लोकांना लुबाडण्यास सुरूवात केली होती. काही प्रकरणात गुंतवणूक करणारे रोख रक्कम घेऊन आले की, टोळीमधील काही जण खोटे पोलिस म्हणून यांच्यावर धाड टाकून आणलेले पैसे घेऊन जात होते.
‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!
सध्या लोकांची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी किंवा गुंतवणूकदारांनी पैशांच्या आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना पूर्ण खात्री करून घ्या. जास्त परतावा मिळतो म्हणून कोणत्याही अनोळखी योजनेत आपल्या मेहनतीचे पैसे गुंतवू नका. अशा घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे, काळाची गरज आहे.
पैसे गुंतवण्याचे विविध आणि खात्रीशीर पर्याय उपलब्ध आहेत!
सध्याचा काळ सर्वांसाठीच खूप अडचणीचा आहे. आर्थिक मंदीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात महागाई काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पैशांचा जपून आणि योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सरकारने अधिकृतरीत्या बरेच पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. ज्यात शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सिक्युरिटी बॉण्ड्स, सेव्हिंग अकाऊंट, फिक्स डिपॉझिट आदी बरेच पर्याय आहेत. जे खात्रीशीर आहेत आणि सरकारची यावर नजर असते. त्यामुळे कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याच्या नादात नको त्या योजनांमध्ये गुंतवणूक करण टाळावे.
QR Code पासून लॉटरी फ्रॉड, आधार कार्डद्वारे लोकांची फसवणूक!
समाजात सध्या वेगवेगळ्या फ्रॉडद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. या फसवणुकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घ्या. स्मार्ट फोन आणि Apps वापरत असाल तर वेळोवेळी अपडेट होणारी टेक्निकल माहिती समजून घ्या. अनोळखी लिंक किंवा लॉटरीसारख्या फ्रॉडपासून लांब राहा. QR Code हा पैसे पाठवण्यासाठी स्कॅन केला जातो. त्यामुळे तुम्हाला पैसे येणार आहेत की, द्यायचे आहेत. याबाबत जागरूक राहा आणि स्वत:च्या मेहनतीने कमावलेले पैसे जपून वापरा आणि अशा फ्रॉडपासून सुरक्षित राहा.