Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Finance Digital Literacy: आर्थिक - डिजिटल साक्षरता काळाची गरज!

Finance Digital Literacy: आर्थिक - डिजिटल साक्षरता काळाची गरज!

Image Source : www.development.asia.com

येणारा काळ पूर्णपणे डिजिटल असून अशावेळी तुम्ही त्यात मागे राहिलात तर तुम्हाला त्याचे लाभ ही घेता येणार नाहीत आणि इतर लोक तुमची फसवणूक करू शकतात. यासाठी आर्थिक डिजिटल व्यवहाराची माहिती घेणे आवश्यक आहे.

पैसे काय आहेत, पैशांचा वापर कुठे, कशासाठी आणि कशा पद्धतीने करतो, याचे सारासार भान असणे आणि एकूणच आपल्या पैशासंबंधीचे व्यवहार स्वतंत्रपणे निर्णय घेऊन करता येणे, म्हणजे आर्थिक साक्षरता. आपल्याकडे साक्षरतेचे जाणीवपूर्वक शिक्षण दिले जाते. पण आर्थिक आणि आता तर डिजिटल साक्षरता ही काळाची गरज बनली आहे. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे हा आर्थिक साक्षरतेचा एक भाग आहे. याचे शिक्षण आपल्याला कुटुंबातून, नातेवाईकांकडून किंवा मित्रपरिवाराकडून मिळत असते. पण या शिक्षणातही आता इतका बदल झाला आहे की, त्याचे डिजिटल शिक्षण घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक डिजिटल शिक्षणामुळे फायदा होण्याची अनेक कारणे आहेत. पण त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक डिजिटल शिक्षणामुळे कोणाकडून आर्थिक फसवणूक होण्यापासून सुरक्षित राहू शकता.

आर्थिक साक्षरता (Financial literacy) म्हणजे काय?

स्वत:च्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी किमान पैसे कमवताना किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. कॉलेजचे शिक्षण घेईपर्यंत आई-वडिलांकडून खर्च करण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे ते कसे आणि कुठे खर्च करायचे याचे भान नसते. त्यांच्या दृष्टीने हे खर्च करण्यासाठी दिले आहेत. म्हणजे ते खर्च झाले पाहिजेत, एवढाच विचार असतो. पण खर्च करण्यापूर्वी आपल्या पालकांनी पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट केले असतील याची कल्पना नसते. म्हणून आर्थिक साक्षरतेचे ज्ञान असणे हे खूप आवश्यक आहे. याचे ज्ञान नसेल तर अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या फक्त तरूण, गरीब, वृद्ध  यांनाच भेडसावत नाहीत तर श्रीमंत, मध्यमवर्गीय लोक, शिकले सवरलेले यांना ही याचा फटका बसू शकतो. म्हणून आर्थिक साक्षरतेबरोबरच आता डिजिटल साक्षर असणे अत्यंत गरजेचे आहे.

डिजिटल साक्षरता (Digital literacy) म्हणजे काय?

डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट वापरणे आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करणे किंवा नव्याने शिकूण घेणे. दररोज छापून येणाऱ्या वर्तमानपत्राप्रमाणेच आता छापील नोटा हाताळण्याची सवय ही कमी कमी होत चाचली आहे. हातात पैसा न घेता सर्व गोष्टी लिलया करता येणे हीच डिजिटल आर्थिक साक्षरतेची मोठी क्रांती आहे.

डिजिटल साक्षरता आणि भारत

  • चीननंतर भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी ऑनलाईन बाजारपेठ आहे.
  • जानेवारी 2022 मध्ये भारतात 658 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत.
  • 2021 ते 2022 दरम्यान भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 34 दशलक्ष म्हणजे 5.4% ने  वाढली आहे.
  • जानेवारी 2021 मध्ये भारतात इंटरनेटचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 45% इतके होते.

राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान

भारतातील डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. 2020 पर्यंत भारतातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (एनडीएलएम) सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत लोकांना डिजिटल पेमेंट्स, ऑनलाईन बॅंकिंग सुविधेचा वापर, प्रत्यक्ष चलनाचा वापर टाळून डिजिटल करन्सीचा वापर कसा करायचा. याचबरोबर डिजिटल व्यवहारातून लोकांची फसवणूक होणार नाही याची काळजी कशी घ्यायची, याचेही शिक्षण दिले जात आहे.

इंटरनेट आणि पैशांशी संबंधित गोष्टींचा ऑनलाईन वापर करताना अशी काळजी घ्या

  • सार्वजनिक ठिकाणी मिळणारे फ्री वाय-फाय वापरणे टाळा.
  • स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अद्ययावत करा.
  • सर्व प्रकारचे पासवर्ड नियमितपणे बदलत रहा.
  • इतरांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून नेट-बँकिंगचे व्यवहार करू नका.
  • इंटरनेट ब्राउझ करताना वेबसाइटच्या यूआरएलची सुरूवात सुरक्षिततेसाठी "https" ने असेल तरच ओपन करा.
  • वैयक्तिक बँक अकाऊंट नंबर, डेबिट/ क्रेडिट कार्ड नंबर आणि पिन कोणालाही सांगू नका.
  • नेट-बँकिंग किंवा ऑनलाइन खरेदी सुरक्षित करण्यासाठी डिजिटल साक्षर बना.

डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत आताची तरूण पिढी खूपच सजग आहे. उलट ती मोठ्यांपेक्षा दोन पाऊले पुढे आहेत. पण त्याचवेळी आर्थिक साक्षरतेसाठी त्यांना परिश्रम घेणे गरजेचे आहे.   उद्याचा दिवस कसा असेल हे आजच ठरवायला हवे. त्याचे नियोजन करायला हवे. यासाठी साक्षरता असणे महत्त्वाचे आहे.