Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँकिंग फसवणुकीचे प्रकार (Types of Frauds in Banks) आणि सुरक्षित बँकिंग टिप्स

बँकिंग फसवणुकीचे प्रकार (Types of Frauds in Banks) आणि सुरक्षित बँकिंग टिप्स

ओटीपी द्या, क्यूआर कोड स्कॅन करा, यूपीआय पिन द्या, अशा प्रकारे बँक खात्याशी संबधित गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी फसवणुकीचे विविध प्रकार समजून घ्या.

सध्याच्या काळात बहुतांश आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन होत आहेत. पण तितक्याच प्रमाणात ऑनलाईन व्यवहारातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. पेटीएम केवायसी, क्यूआर कोड स्कॅन करा, यूपीआय पिन द्या किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने लोकांकडून गोपनीय माहिती मिळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

पेटीएम केवायसी किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने लोकांना टेक्स्ट किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठविले जातात. काही वेळेस थेट मोबाइलवर फोन करून पेटीएम किंवा बँकेमधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधतात व पुढील कार्यवाहीसाठी लिंक किंवा क्यूआर कोड पाठवतात. त्यातील लिंक ओपन केल्यानंतर किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, यूपीआय पिन व बँक खात्याची माहिती, पासवर्ड आदी भरण्यास भाग पाडले जाते आणि थोड्यावेळाने नकळत आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.

बँकिंग फसवणुकीचे विविध प्रकार (Types of Frauds in Banks)

Types of Frauds in Banks

फिशिंग (Phishing)

तुमचे बँक खात्याविषयीचे गोपनीय तपशील मिळवण्यासाठी 'फिश' करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला एखाद्या प्रसिद्ध बॅंकेच्या नावाने किंवा एखाद्या लोकप्रिय वेबसाईटच्या नावाने ई-मेल पाठवले जाते. या ई-मेलमध्ये तुम्हाला वेगवेगळी प्रलोभने दाखवून तुमची बॅंक खात्याविषयीची माहिती मागवली जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, बँका लॉग-इन, ट्रान्झॅक्शन पासवर्ड, वन टाइम पासवर्ड (OTP) इत्यादी गोपनीय माहिती खातेदाराला कधीही विचारत नाहीत.

स्पीयर फिशिंग (Spear Phishing)

स्पीयर फिशिंग हा ई-मेलद्वारे ‘फिश’ करण्याचा असा प्रकार आहे. ज्यात तुम्हाला तुमच्या विश्वासातील माणसाकडूनच नाही तर तुमच्या कंपनीतील एका सिनिअरकडून किंवा बॉसकडून ई-मेल येते. आतापर्यंत निदर्शनास आलेल्या बऱ्याच प्रकरणात कंपनीतील सिनिअरकडून आणि जवळच्या नातेवाईकांकडून अशाप्रकारचे मेल आले आहेत. ज्यात कौटुंबिक कार्यक्रमाशी संबंधित माहिती असते किंवा ऑफिसमधील एखाद्या प्रोजेक्टविषयीच्या माहितीशी संबंधित आहे असे भासवून लिंक जोडलेली असते. जेव्हा या लिंकवर क्लिक केले जाते तेव्हा लिंकमधून ट्रोजन किंवा मालवेअर डाऊनलोड होतो. तो आपली गोपनीय माहिती चोरतो. तर काही वेळेस तुम्हाला तुमची गोपनीय माहिती भरण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून दिला जातो.

स्पूफिंग (Spoofing)

वेबसाइट स्पूफिंग म्हणजे, लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विशेष पद्धतीने वेबसाइट तयार केल्या जातात. या वेबसाईट अस्सल वाटाव्यात खऱ्या वेबसाईटवरील लोगो, ब्रॅण्ड नेम, ग्राफिक्स आणि कोड्स कॉपी करतात. तसेच ब्राऊझर विंडोमध्ये दिसणारी URL आणि वेबसाईटच्या तळाशी दिसणारे पॅडलॉकही कॉपी करून लोकांची दिशाभूल करतात.

विशिंग (Vishing)

विशिंग म्हणजे, बॅंकेतून फोन करतोय असे सांगून तुमचा बॅंकेचा युझर आयडी, लॉगिन आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड, ओटीपी (वन टाईम पासवर्ड), यूआरएन (युनीक रजिस्ट्रेशन नंबर), कार्ड पिन, सीव्हीव्ही क्रमांक अशी माहिती मागितली जाते. काही वेळेस तुमची वैयक्तिक माहिती जसे की, जन्मदिनांक, आईचे पहिले नाव काय इत्यादी विचारून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

स्किमिंग (Skimming)

एटीएम कार्ड, क्रेडिट व डेबिट कार्ड यावर असलेल्या मॅग्नेटिक पट्टीवरील माहिती चोरण्याच्या प्रकाराला स्किमिंग म्हणतात. फसवणूक करणारे वेगवेगळ्या आयडिया वापरून आपल्या क्रेडिट / डेबिट / एटीएम कार्डच्या मॅग्नेटिक पट्टीवरील माहिती गोळा करतात. ही माहिती गोळा करण्यासाठी एटीएमच्या मशीनमध्ये किंवा आपण जिथे जिथे कार्ड स्वॅप करतो तिथ एक लहान डिव्हाइस लावले जाते. यातून ही माहिती चोरली जाते. तर काही ठिकाणी कार्डचा पिन क्रमांक चोरण्यासाठी लहान कॅमेरे लावले जातात. अशाप्रकारची फसवणूक एटीएम, रेस्टॉरंट, दुकाने किंवा मॉलमध्ये होण्याची शक्यता अधिक असते.

स्मिशिंग (Smishing)

हा फिशिंग सारखाच फसवणूक करणारा स्मिशिंग प्रकार आहे. यात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला एसएमएस (SMS) पाठवून त्यांच्या खात्याविषयीची माहिती मागितली जाते. यात बॅंकेचे खाते अपडेट करणे, नवीन प्रोग्रामसाठी नोंदणी करणे अशी कारणे दाखवून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

सिम स्वॅप (SIM Swap)

सिम स्वॅप प्रकारात तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासाठी नवीन सिमकार्ड मिळवून देतो असे सांगितले जाते. आणि नवीन सिमकार्डच्या मदतीने तुमच्या बँकेचे OTP आणि इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे करा

  • अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
  • अनोळखी व्यक्तींनी पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका.
  • अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यानुसार कोणतेही मोबाईल अॅप डाउनलोड करू नका.
  • बॅंकिंगविषयीची आपली कोणतीच माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.
  • आपल्या खात्यात ऑनलाईन पैसे घेण्यासाठी यूपीआय पिन देण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते.