अनेकदा पगार चांगला असूनही महिना संपता संपता हात आखडता घ्यावा लागतो. दैनंदिन खर्च आणि बचतीचा ताळमेळ बसवणे अनेकांना कठीण जाते. तुमचे आर्थिक आयुष्य शिस्तबद्ध करण्यासाठी आणि भविष्याची चिंता मिटवण्यासाठी '70/10/10/10' हा नियम अत्यंत प्रभावी ठरू शकतो. हा नियम नेमका काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा, हे सविस्तर समजून घेऊया.
काय आहे 70/10/10/10 नियम?
70% - दैनंदिन गरजांसाठी: तुमच्या पगारातील सर्वात मोठा वाटा म्हणजेच 70 टक्के हिस्सा रोजच्या खर्चासाठी वापरावा. यामध्ये घराचे भाडे किंवा ईएमआय, मुलांच्या शाळेची फी, वीज बिल, विमा हप्ते आणि किराणा सामानाचा समावेश होतो. जर हा खर्च 70 टक्क्यांच्या वर जात असेल, तर तुम्हाला तुमच्या खर्चात कपात करण्याची किंवा उत्पन्न वाढवण्याची गरज आहे.
10% - दीर्घकालीन गुंतवणूक: पगारातील 10 टक्के रक्कम भविष्यातील मोठ्या कामांसाठी गुंतवावी. मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे घर किंवा लग्न यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांसाठी ही रक्कम बाजूला ठेवणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्याने तुम्हाला त्यावर चांगला परतावा मिळू शकतो.
10% - आपत्कालीन किंवा अल्पकालीन बचत: आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. जसे की अचानक उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी किंवा घरातील साहित्याची दुरुस्ती. अशा वेळी तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीला हात न लावता कामाला येईल अशी 10 टक्के रक्कम स्वतंत्रपणे वाचवून ठेवावी.
10% - प्रगती आणि कर्जमुक्तीसाठी: उर्वरित 10 टक्के रक्कम तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी वापरा. यामध्ये नवीन कौशल्य शिकणे किंवा एखादा कोर्स करणे यांचा समावेश होतो. जर तुमच्यावर कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल असेल, तर ते फेडण्यासाठी या हिश्शाचा वापर करावा.
अशा प्रकारे पगाराची विभागणी केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि अचानक येणाऱ्या खर्चांमुळे तुमची गुंतवणूक विस्कळीत होत नाही.