One Nation One Card: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) विकसित केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीतील (National Common Mobility Card) ‘मुंबई 1(Mumbai One)’ कार्डद्वारे आता मेट्रोसोबत बेस्ट बसमधूनही प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मेट्रो आणि बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पहिल्याच दिवशी 1787 कार्डची यशस्वी विक्री
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला(MMRDA) मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टसाठी एकच तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी दिली होती. गेली अनेक वर्षे हे काम सुरू असून अखेर ही जबाबदारी एमएमआरडीएने(MMRDA) पूर्ण केली. एमएमआरडीएने ‘मुंबई 1(Mumbai One)’ या नावाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तयार केले आहे. या कार्डचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यानंतर 20 जानेवारीपासून ‘मेट्रो 2A’ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो 7’ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेतील सर्व मेट्रो स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाटपाच्या पहिल्याच दिवशी(20 जानेवारी) 1787 कार्डची यशस्वी विक्री झाली.
लवकरच ‘मेट्रो 1’, मोनो आणि रेल्वेशी हे कार्ड जोडले जाणार
सध्या तरी या कार्डाचा वापर केवळ ‘मेट्रो 2A’ आणि ‘मेट्रो 7’साठीच करता येणार आहे. ‘मेट्रो 1’ (घाटकोपर ते वर्सोवा), रेल्वे आणि बेस्टशी ही सुविधा जोडण्यासाठी चाचणी सुरू असून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे, असे सांगण्यात येत होते. मात्र आता याच कार्डवरूनच प्रवाशांना बेस्ट बसचे तिकीटही उपलब्ध होणार आहे. ‘मुंबई 1(Mumbai One)’ कार्डधारकांना मेट्रोसह बेस्ट बसच्या तिकिटाची सुविधाही उपलब्ध झाली आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास(S.V.R. Shrinivas) यांनी दिली. आता लवकरच ‘मेट्रो 1’, मोनो आणि रेल्वेशी हे कार्ड जोडण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात या कार्डचा वापर करून देशभरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे तिकीटही काढता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.