Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life threat to Adani: अपहरण आणि दहशतवादी हल्ल्यातून कसे वाचले गौतम अदानी?

Gautam Adani

Image Source : www.thewire.in

गौतम अदानी हे अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आशियातील प्रथम आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी जवळून मृत्यू पाहिल्याचा किस्सा त्यांनी नुकत्याच एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. तिथे दहशतवादी हल्ला सुरु असताना अडकलेल्या लोकांपैकी गौतम अदानी हे एक होते. मुलाखतीत ते म्हणाले, "त्या दिवशी दुबईहून मुंबईत मला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या मित्रांसोबत मी ताज हॉटेलमध्ये चर्चा केली. चर्चा आटोपल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. रात्र होत आली होती, मी जेवणाचे पैसे देण्यासाठी जायला निघालो. परंतु काही मित्रांनी मला थांबवले आणि काही तरी चर्चा करायची आहे असे म्हणाले. मी त्यानंतर पुन्हा कॉफी पीत पीत मिटिंगमध्ये सहभागी झालो.” मिटिंगनंतर काही वेळातच हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आम्हाला दिली गेली.         

लगेच हॉटेल कर्मचाऱ्यांनी आम्हांला मागच्या दाराने स्वयंपाकघरात घेऊन गेले. तिथे मला ते कर्मचारी म्हणाले, “जर बिल भरण्यासाठी तुम्ही लॉबीत गेला असता तर तुम्ही देखील दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला असता”. या हल्ल्याच्यावेळी मी रात्रभर इतर नागरिकांसोबत हॉटेलमध्ये अडकून पडलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कमांडो आले तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांना सुरक्षित हॉटेलमधून बाहेर काढले.  दहशतवादी हल्ल्याची ही आठवण माझ्यासाठी वेदनादायी आहे असेही ते म्हणाले.         

खंडणीसाठी अदानींचे झाले होते अपहरण         

गौतम अदानी यांनी 90 च्या दशकात घडलेली आणखी एक आठवण सांगितली. 1998 मध्ये फझल-उर-रेहमान आणि भोगीलाल दर्जी या दोन गुंडांनी अदानींचे अपहरण केले होते.खंडणीसाठी हे अपहरण केले गेले होते. त्यांच्या अपहरणाची घटना आठवत गौतम अदानी यांनी सांगितले की, "मी माझ्या आयुष्यात दोनदा मृत्यू पाहिला, आज मी जिवंत आहे ते केवळ देवाच्या आशीर्वादामुळे." माझे अपहरण झाले त्या दिवशी मी निवांत झोपलो होतो, कारण आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्याची चिंता करून उपयोग नाही असे देखील ते म्हणाले.         

मुंबईचा 26/11 चा दहशतवादी हल्ला         

देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला केला होता.या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. याशिवाय त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस आणि ओबेरॉय ट्रायडंट आदी ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होते.