अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती तब्बल 137.4 बिलियन डॉलर ( भारतीय चलनात 10.95 लाख कोटी रुपये ) इतकी वाढली आहे. अदानी ब्लूमबर्ग बिलेनरिज इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) या जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांनी फ्रान्सचे श्रीमंत उद्योजक बर्नाड अरनॉल्ट यांना मागे टाकले. (Adani Group's chairman Gautam Adani now third richest person in world)
शेअर मार्केटमध्ये तेजीत असलेल्या अदानी समूहातील शेअर्सने गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ केली आहे. अदानींचे शेअर्स केवळ त्यांनाच नाहीत तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना देखील मालामाल करत आहे.अदानी समूहाने मागील 10 वर्षात ऊर्जा, खनिजे, विमानतळे, बंदर विकास आणि माल वाहतूक, लष्करी सामुग्री, अवकाश तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे, दूरसंचार, किराणा या व्यवसायात विस्तार केला आहे.रिलायन्स आणि टाटा समूहानंतर अदानी समूह हा व्यावसायिक उलाढालीमध्ये भारतातील तिसरा मोठा उद्योग समूह आहे.
ब्लूमबर्ग बिलेनरिज इंडेक्समध्ये अदानींनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अदानी यांची संपत्ती चालू वर्षात 4.88 लाख कोटींची जबरदस्त वाढ झाली आहे. कोरोना संकटात जगभरातील श्रीमंत उद्योजकांची संपत्ती कमी होत असताना अदानी यांच्या संपत्तीत मात्र प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ब्लूमबर्ग बिलेनरिज इंडेक्समध्ये 11 व्या स्थानी आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 91.9 बिलियन डॉलर्स (7.35 लाख कोटी) इतकी आहे. अंबानी यांच्या संपत्तीत चालू वर्षात 196 कोटींची वाढ झाली आहे.
Table of contents [Show]
अदानींच्या शेअर्सने दिला प्रचंड रिटर्न
अदानी समूहातील अदानी एंटरप्राईज, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स अॅंड एसईझेड, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या सात कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. यातील बहुतांश शेअर्सनी गुंतवणूकदारांना मागील दोन वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. 2020 पासून काही शेअर्सने 1000% इतका प्रचंड परतावा दिला आहे.
अंबानी आणि जॅक मा यांना जे जमले नाही ते अदानींनी करुन दाखवले
जागतिक पातळीवरील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या पंक्तीत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेणारे गौतम अदानी हे आशियातील पहिले उद्योजक ठरले आहेत. एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अलिबाबाचे प्रमुख जॅक मा (Jack Ma) यांनीही आतापर्यंत ही कामगिरी करता आलेली नाही. आता गौतम अदानी यांच्या पुढे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) आणि अॅमेझॉनचे टॉप बॉस जेफ बेझॉस (Jeff Bezos) हे दोन बिलेनरिज बिझनेसमन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. एलन मस्क यांची एकूण संपत्ती 251 बिलियन डॉलर्स आणि जेफ बेझॉस यांची संपत्ती 153 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
एनडीटीव्ही या कंपनीच्या खरेदीसाठी ओपन ऑफर
गौतम अदानी यांनी माध्यम क्षेत्रातील विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. (Gautam Adani Expand his footprints in Media Industry) त्याचाच एक भाग म्हणून एनडीटीव्ही या कंपनीवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.अदानी समूहाने थेट विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडवर ताबा मिळवला आहे. विश्वप्रधान कमर्शिअलचा एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आता तो अदानी समूहाच्या मालकीचा झाला आहे. त्याशिवाय अदानी समूहाने एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे. यावर आक्षेप घेत एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी सेबीकडे धाव घेतली आहे.
सामाजिक कार्यासाठी 60 हजार कोटींची तरतूद
अदानी समूहाने विविध सामाजिक कार्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदानी यांनी धर्मदाय कामासाठी तब्बल 60,000 कोटींची घोषणा केली होती.CSR अंतर्गत आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास या मुख्य क्षेत्रावर अदानी समूहाने लक्ष केंद्रीत केल आहे. विशेषत: ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
कर्जाचा डोंगर तरीही गौतम अदांनींची घोडदौड
काही दिवसांपूर्वी क्रेडिटसाईट्स या फिच समूहातील कंपनीने (CreditSights, a Fitch Group Unit) अदानी समूहावरील भरमसाठ कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. अदानी समूह पत नसताना कर्ज काढून विविध क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. या समूहाचे मूल्यांकन हे वाजवीपेक्षा जास्त असल्याचे (Over Leveraged) दावा क्रेडिट साईट्सने आपल्या अहवालात केला होता. त्याचा फटका शेअर्सला बसला. अदानींच्या सर्वच शेअरमध्ये या रिपोर्टनंतर मोठी घसरण झाली होती.