टाटा समुहातली (Tata Sons) एक अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातली (Engineering & Construction) कंपनी टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects lmt) नवीन वर्षी 400च्या वर तरुणांची भरती करणार आहे. यावर्षी पहिल्यांदा नावाजलेल्या संस्थांमधले अभियंते टाटा प्रोजेक्ट्स कंपनी आपल्या ताफ्यात भरती करणार आहे.
संभाव्या 400 उमेदवारांपैकी 255 उमेदवार हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतले (NIT) असतील. तर उर्वरित उमेदवार हे देशातल्या विविध संस्थांमध्ये किमान पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतील, असं टाटा प्रोजेक्ट्सचे मनुष्यबळ विकास अधिकारी गणेश चंदन यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
टाटा समुहाने आपल्या नोकरीच्या जाहिराती www.tata.com या वेबसाईटवरही दिल्या आहेत. प्लानिंग मॅनेजर, डिझाईन मॅनेजर, बिम मॉडेलर, कन्स्ट्रक्शन मॅनेजर अशा 38 पदांसाठी ही भरती होणार आहे. आणि यातल्या काही जागा मुंबईत तर काही हैदराबाद आणि देशाच्या इतर भागातही आहेत. यातल्या बहुतेक नोकऱ्या या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी आहेत.
अलीकडेच टाटा समुहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनीही टाटा समुह अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. याखेरीज हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही कंपनीला विस्तार करायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत तिथंही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
टाटा प्रोजेक्स कंपनीची स्थापना 1979मध्ये झाली आहे. आणि देशातली ही एक पहिली अभियांत्रिकी प्रकल्प उभे करणारी कंपनी आहे. कंपनीमध्ये साधारण 11,000 लोक याघडीला काम करतात. पण, अलीकडच्या काळात मोठी गुंतवणूक पण, परतावा कमी असल्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. आगामी दोन वर्षांत झालेलं नुकसान भरून काढून पुन्हा फायद्यात येण्याचं धोरण कंपनीने ठेवलं आहे.
हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. अलीकडेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलिअम संस्थेशी करार करून हरित ऊर्जा क्षेत्रात नवे प्रकल्प उभे करण्यासाठी त्यांची मदत घ्यायचं ठरवलंय.
त्यासाठी कंपनीला विस्तार करायचा आहे. आणि अलीकडेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये झालेल्या कॅम्पस मुलाखतीतही त्यांनी सहभाग नोंदवला.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            