माहिती-तंत्रज्ञान आणि इतरही महत्त्वांच्या क्षेत्रांमध्ये भारतात जगाच्या तुलनेत जास्त रोजगार उपलब्ध होईल असा अहवाल रँडस्टॅड या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या रोजगारविषयक संस्थेनं सादर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोव्हिड नंतर देशातील तंत्रज्ञान विषयक कंपन्यांमध्ये मंदीचं वातावरण आहे. पण, 2023 मध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रही कात टाकेल. आणि इथं रोजगाराचा ओघ वाढेल, असं रँडस्टॅडचा अंदाज आहे.
जगात युद्ध आणि आर्थिक मंदीचं वातावरण असताना भारतात आर्थिक आणि राजकीय स्थिरता चांगली आहे. परिणामी, येणाऱ्या वर्षांत इथे परकीय गुंतवणूक वाढेल. आणि त्यामुळे इथं रोजगाराचा ओघही चांगला असेल असं अहवालात म्हटलंय. रोजगाराच्या बाबतीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर असेल असंही अहवालात म्हटलंय.
‘जगभरात सगळ्याच कंपन्यांना आता उत्पादन आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी करायचा आहे. त्यासाठी कंपन्यांसमोर पर्याय आहे तो भारताचा. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम आऊटसोर्सही करता येतं. आणि जागतिक परिस्थिती बघता आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात भारतासाठी चांगली असेल अशीच चिन्ह आहेत.’ रँडस्टॅड इंडियाचे एक संचालक संजय शेट्टी यांनी मीडियाशी बोलताना अहवालातले बारकावे सांगितले.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी वाईट घडून गेलं आहे, अशी भूमिका मांडली.
‘मेटा, ट्विटर सारख्या मोठ्या तंत्रज्ञान विषयक कंपन्यांनी 2022मध्ये नोकर कपात केली. आर्थिक विश्वात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही हाच ट्रेंड दिसला. त्यामुळे एकूणच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या भीतीचं वातावरण आहे. भारतातली परिस्थितीही वेगळी नाहीए. पण, नवीन वर्षी बाहेरच्या देशांमधून भारतीय इंजिनिअर्सना मागणी येईल. किंवा इथून बाहेरच्या देशांसाठी काम करता येईल,’ असं शेट्टी म्हणाले.
भारतातली एक कंपनी टीमलीजने नोकरकपातीचा आकडा देताना स्टार्टअपमधून 23,000 लोकांना काढून टाकल्याचा अहवाल मध्यंतरी सादर केला होता. पण, यावर उत्तर देताना शेट्टी म्हणाले की, ‘तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार होतो आहे. आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकतील आणि उद्योगाला आवश्यक कौशल्य ज्यांच्याकडे असेल अशा लोकांना नोकरी मिळवणं कठीण जाणार नाही.’
रँडस्टॅडने आपल्या अहवालाचा समारोप करतानाही एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. भारतातल्या आणि परदेशातल्याही माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांकडून हा अहवाल तयार करताना मतं मागवण्यात आली होती. आणि त्यावरून या अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आलाय की, भारतातल्या कंपन्या सध्या सबुरीने निर्णय (Wait & Watch) घेण्याच्या मूडमध्ये आहेत. एकदा व्यवहार सुरळीत सुरू झाले की, या कंपन्याही रोजगाराच्या बाजारात उतरतील असा रँडस्टॅडचा अंदाज आहे.