यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या गुवाहाटी आणि मुंबईच्या संस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे . कारण, दोन्ही संस्थांत विद्यार्थ्यांना नोकरी लागण्याचं प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. पण, जगभरातली मंदी आणि अनिश्चितता यामुळे पॅकेज कमी झालं आहे. आणि परदेशात नोकरी मिळालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना हाँगकाँग (Hong Kong), सिंगापूर (Singapore) जपानमध्ये (Japan) नोकरीच्या संधी जास्त आहेत.
जेन स्ट्रीट (Jane Street) या फायनान्स क्षेत्रातल्या अमेरिकन कंपनीने भारतातून चार आयआयटीयन्सना (IITeans) नोकरीची संधी दिली आहे. आणि त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयाचं पॅकेजही कंपनीने देऊ केलंय. पण, अमेरिकन व्हिसा प्रक्रिया हल्ली वेळखाऊ झाल्यामुळे कंपनीने सध्या तरुणांना भारतातून किंवा हाँगकाँगमधून काम करण्याची ऑफर दिली आहे.
कुठल्या क्षेत्रात आहेत नोकऱ्या?
आयआयटी प्लेसमेंटपासून देशातला कॉलेजमधील प्लेसमेंटचा हंगाम सुरू होतो. आणि मूळातच आयआयटी संस्था नावाजलेली असल्यामुळे जगभरातल्या कंपन्या तिथं होतकरु तरणांची परीक्षा घेण्यासाठी येतात. अशावेळी आयआयटीमधल्या तरुणांना कुठल्या क्षेत्रात नोकरी मिळाली, याकडे भारतातल्या सगळ्याच तरुण वर्गाचं लक्ष असतं.
अनेकदा भारतीय कंपन्यांची पे पॅकेजही त्यावरून ठरतात. त्यामुळे इथला ट्रेंड तपासणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं. आयआयटीचा यावर्षीचा कल पाहिला तर माहिती-तंत्रज्ञान, ट्रेडिंग कंपन्या, जागतिक बँका, युएक्स डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद दिला आहे. देशभरात जवळ जवळ 350 कंपन्या सध्या तरुणांना ऑनबोर्ड घेण्याच्या प्रक्रियेत आहेत.
भारतीय स्टार्टअपमध्ये रोजगाराच्या जास्त संधी
जागतिक रोजगाराच्या संधी कमी होत असताना भारतीय कंपन्या आणि खासकरून स्टार्ट अपनी विद्यार्थ्यांना वार्षिक कोटी - कोटी रुपयांची पॅकेज देऊ केली आहेत. भारतीय कंपन्यांचं सरासरी वार्षिक पॅकेज आहे एक कोटी दहा लाख रुपयांचं. भारतीय कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया, टाटा स्टील, प्रॉक्टर अँड गँबल, शेल इंडिया, बजाज ऑटो या कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात उत्साहाने भाग घेतला. आयआयटी मद्रासच्या 25 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी प्रत्येकी एक कोटींची ऑफर मिळाली.