Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Byju's Layoff: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Byju's Layoff: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Image Source : www.techcrunch.com

Byju's Layoff: एडटेक कंपनी बायजूमध्ये पुन्हा नोकरकपात होत आहे. यावेळी तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना कंपनीनं घरी पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं कर्मचारी कपात केली होती. आता त्याला काही कालावधी उलटतो न उलटतो पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एडटेक (Edtech) कंपनी बायजू मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. ईडीचा छापा (Enforcement Directorate) असो किंवा नोकरकपात. मागच्या काही महिन्यांत कंपनीच्या घडामोडी पाहता अनेक कर्मचाऱ्यांना बेकार होण्याची वेळ आली आहे. यावेळी 1000 कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या छाटणीचा परिणाम बायजूची सहकंपनी व्हाइटहॅट ज्युनिअरच्या (Whitehat jr) कर्मचाऱ्यांवरही दिसून येत आहे. कंपनी सध्या कठीण काळातून जात असून कमाईसाठी संघर्ष सुरू आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच कंपनी आपल्या खर्चात कपात करत असून या धोरणाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जात आहे.

विविध कंपन्यांमध्ये नोकरकपात

जगभरात विविध कंपन्यांमध्ये नोकरकपात केली जात आहे. मागच्या वर्षी एप्रिलपासून संपूर्ण जगभरात सुरू झालेला छाटणीचा टप्पा अद्यापही सुरूच आहे. याचा बायजूवरही परिणाम झाला आहे. बायजूच्या विपणन (Marketing), विक्री (Sales) आणि व्यवसाय विकास Business development) तसंच उत्पादन (Product) आणि तंत्रज्ञान (Technology) टीममधल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्हाइटहॅट ज्युनिअर कर्मचाऱ्यांचाही या कर्मचारी कपातीच्या लिस्टमध्ये नाव असल्याचं बोललं जात आहे.

बहुतांश कर्मचारी थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टमधले

बायजूनं केलेल्या कर्मचारी कपातीतले बहुतांश कर्मचारी हे थर्ड पार्टी कॉन्ट्र्रॅक्टवरचे आहेत. अशाप्रकारचं धोरण अनेक कंपन्या अवलंबतात जेव्हा व्यवसायात आगामी काळात त्यांना अनिश्चितता दिसून येते. महसूल किंवा नफा कमी होईल, अशी भीती असते त्यावेळी कंपनी आधीच कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टवर ठेवते. ज्यामुळे नंतर कंपनीचा खर्च वाढू नये शिवाय त्यांना नंतर करार वाढवून न देता कमीदेखील सहजरित्या करता येतं.

याआधीही केली होती कर्मचारी कपात

सध्या कंपनीनं 1000 कर्मचाऱ्यांना कमी केलं आहे. हा आकडा मोठा आहेच. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही कंपनीनं कॉस्ट कटिंगबाबतचं धोरण जाहीर केलं होतं. त्यानंतर कंपनीनं सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही कंपनीनं कोट्यवधींचं पॅकेज असलेल्या अनेक अधिकाऱ्यांसह सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. आता पुन्हा एकदा कंपनीनं 1000 लोकांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचारी काय म्हणत आहेत?

बायजूनं कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नुकतंच बायजूचे कर्मचारी अर्पित सिंह यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. आपली नोकरी कशी गमावली हे त्यात त्यांनी सांगितलं आहे. आश्चर्य म्हणजे अर्पित सिंह हे या कंपनीत रिटेन्शन मॅनेजर होते. म्हणजेच ते कर्मचाऱ्यांना रिटेन करण्याचा प्रयत्न करत होते. आता बायजूनं रिटेन्शन मॅनेजरलाच काढून टाकलं आहे. अर्पित सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, की ते 10-8 वर्क कल्चरमध्ये कधीही काम करत नव्हते. ते कंपनीसाठी 24 तास उपलब्ध असत. मात्र एके दिवशी एचआरचा अचानक फोन येतो आणि राजीनामा देण्यास सांगण्यात येतं. अशी आपबीती त्यांनी या पोस्टमध्ये कथन केली आहे.

आणखी किती कर्मचारी?

वर्षभराच्या कालावधीतच अर्पित यांना नोकरी गमवावी लागली. मात्र, ही घटना तर केवळ एका कर्मचाऱ्याची आहे. अशी 4500 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची स्थिती आहे. आता आगामी काळात कंपनीचं नेमकं धोरण काय असणार आहे, आणखी किती कर्मचाऱ्यांना कंपनी घरी पाठवणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.