कथित विदेशी चलन उल्लंघनाच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) ही कारवाई केली. यानंतर बायजूनंदेखील (BYJU's) तत्काळ निवेदन जारी करत आपली भूमिका आणि एकूण परिस्थिती यावर स्पष्टीकरण दिलंय. आमच्या कंपनी तसंच परिवारांवर ईडीनं छापे टाकल्याचं वृत्त आहे. मात्र ही नियमित चौकशी आहे. चौकशी करणाऱ्या ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. आम्ही चालवत असलेली कंपनी पूर्णत: नियमानुसार सुरू आहे. आम्हाला आमच्या ऑपरेशन्सच्या अखंडतेवर पूर्ण विश्वास आहे. तसंच नैतिकतेची उच्च मानकं राखण्यासाठीदेखील आम्ही वचनबद्ध असल्याचं म्हटलंय. कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन आणि त्यांच्या संबंधित इतर परिवारांची याच चौकशी होत आहे.
Table of contents [Show]
'बायजू'चं निवेदन
ईडीनं छापेमारी केल्यानंतर बायजूनं आपलं निवेदन त्वरीत जारी केलं. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून देत आहोत. त्यांना हवी असलेली कागदपत्रे वेळेत मिळतील, याची हमी आम्ही देतो. त्यांच्या संपर्कात राहू जेणेकरून हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागेल आणि ज्या समस्या निर्माण झाल्या असतील, त्याचं निराकरण त्वरीत होईल, असं निवेदनात म्हटलंय.
फेमा कायद्याचं उल्लंघन?
बायजू या कंपनीसह या मालकाशी संबंधित इतर कंपन्यांचीही झडती घेण्यात आली. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (Foreign Exchange Management Act) तरतुदींनुसार ही करवाई करण्यात आली. बायजू या कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन आणि त्यांची कंपनी 'थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड' यांच्या मालकीच्या दोन अधिकृत आणि एक निवासी अशा एकूण तीन ठिकाणी ही झडती घेण्यात आलीय. ऑनलाइन एज्युकेशनल प्लॅटफॉम असलेलं बायजू हे भारतातलं एक अग्रगण्य स्टार्टअप आहे. कारण याचं मूल्य जवळपास 22 अब्ज डॉलर इतकं आहे. टायगर ग्लोबल, सिकोइया कॅपिटल, जनरल अटलांटिक, प्रासस, ब्लॅकरॉक आणि टेनसेंट यांच्यासह अनेक गुंतवणूकदार बायजूशी संबंधित आहेत.
ED conducts searches at office, residence of Byju's CEO Raveendran
— ANI Digital (@ani_digital) April 29, 2023
Read @ANI Story | https://t.co/qWIhu8uZ7I#ED #Byjus #Bengaluru #Karnataka pic.twitter.com/D8P1JfnyDY
महत्त्वाची कागदपत्रे जप्त
कंपनीची चौकशी सुरू असताना अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तावेद जप्त करण्यात आलीत. यातली अनेक कागदपत्रं आक्षेपार्ह, वादग्रस्त असल्याचं आढळलंय. अशी कागदपत्रं आणि डिजीटल स्वरुपातला डेटा सध्या जप्त करण्यात आलाय, असं ईडीनं म्हटलंय. वर्ष 2011 ते 2023 या कालावधीत कंपनीला कथितपणे 28,000 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक मिळाल्याचंदेखील फेमा कायद्यानुसार समोर आलंय. या गुंतवणुकीसह कंपनीनं जाहिरात आणि मार्केटिंगवर प्रचंड पैसा खर्च केला. तर या कारणासाठी सुमारे 944 कोटी रुपये बुक केले आहेत. विदेशातदेखील हा पैसा गेल्याचं तपासात समोर आलंय.
अनेक तक्रारींनंतर चौकशी
देशभरातल्या कंपन्या तसंच स्टार्टअप्सना आपला वार्षिक आर्थिक अहवाल संबंधित सरकारी यंत्रणांना सादर करणं अनिवार्य आहे. मात्र 2020-21 या आर्थिक वर्षापासून बायजूनं आपला कोणताही आर्थिक तपशील तयार केलेला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही खात्यांचं ऑडिटदेखील केलं नसल्याचं समोर आलंय. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने सादर केलेल्या माहितीची पडताळणी बँकांकडे केली जात आहे. कंपनीच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. या खासगी तक्रारींच्या आधारे कंपनीविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलंय.
ऑडिटमध्ये अनियमितता
कंपनीचं ऑडिट किंवा लेखापरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. मात्र यातच अनियमितता आढळणं ही गंभीर बाब मानली जाते. बायजूचं मागच्या दोन-तीन वर्षांपासूनच ऑडिटच सादर झालेलं नाही. 2020-21च्या लेखापरीक्षित आर्थिक विवरणांमधल्या या विलंबामुळे बायजूसमोरच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहेत. कंपनीनं 18 महिन्यांच्या विलंबानं ऑडिट निकाल दाखल केले आणि महसूल ओळखण्याच्या पद्धतींमध्येदेखील मोठे बदल केले. मागच्या आर्थिक वर्षाचा म्हणजेच 31 मार्च 2022ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या रिझल्टला कंपनीनं अद्याप सार्वजनिक केलेलं नाही.
वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयानंही केली होती चौकशी
2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकूण अहवाल देण्यास उशीर झाला. त्यामुळे बायजूनं 1.2 अब्ज डॉलर टर्म लोन B (TLB) वर व्याजदर वाढवण्याची ऑफर दिलीय. बायजूच्या कर्जदारांनी 1.2 अब्ज डॉलर कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी जास्तीच्या व्याजदराव्यतिरिक्त जवळपास 200 दशलक्ष डॉलर प्री-पेमेंटची मागणी केलीय. ईडीच्या आताच्या कारवाईआधीही बायजूची चौकशी झाली होती. 2021साली वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयानं बायजूची चौकशी केली होती. कथित चोरीच्या याप्रकरणी नंतर बायजूनं थकबाकी भरण्याचं मान्य केलं होतं.