आर्थिक वर्ष 2021-22 साठीचे रिटर्न फायलिंग करण्यासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. उद्या रविवारी 31 जुलै 2022 रोजी रिटर्न फायलिंगची मुदत संपुष्टात येणार आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेल्या टॅक्सपेअर्सची आता रिटर्न फायलिंगसाठी तारांबळ उडाली आहे.(ITR Filing Last Date)
मागील आठवडाभर इन्कम टॅक्स विभागाची बेवसाईट पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने टॅक्सपेअर्स आणि टॅक्स कन्सल्टंट निराश झाले आहेत. आयटीआर फायलिंगच्या (Income Tax Return Filing) निमित्ताने दररोज इन्कमटॅक्स विभागाच्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत वाढल्याने बेवपोर्टलचा काम करण्याचा वेग मंदावला आहे. अगदी दोन आठवड्यापूर्वी काही मिनिटांत होणाऱ्या रिटर्न फायलिंगच्या प्रोसेसला आता तासभर किंवा त्याहून अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ बनली आहे.
स्लो सिस्टमने वैतागलेल्या करदात्यांनी सोशल मिडियावर सरकारविरोधातील संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी रिटर्न फायलिंगला मुदतवाढ (ITR filing date extended) मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र, तूर्त या मागण्यांकडे फारसे लक्ष न देता सरकारने 31 जुलै, 2022 या अंतिम मुदतीवर ठाम राहणे पसंत केलं आहे. त्यामुळे यंदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. ट्विटरवर सध्या #Extend Due Date Immediately हा ट्रेंड चर्चेत आहे. या ट्रेंडला मागील आठवड्याभरापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
31 जुलैनंतर आयटीआर भरण्यासाठी दंड लागणार!
दरम्यान, 31 जुलै 2022 पर्यंत टॅक्स रिटर्न भरला नाही, तर तुम्हाला तो भरण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा (31 डिसेंबर, 2022 पर्यंत) अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला विलंब शुल्क आणि देय कर रकमेवर दरमहा दंड म्हणून व्याज भरावे (ITR due date penalty) लागणार आहे. त्याशिवाय आयटीआर का उशिरा भरला याबाबत विचारणा करणारी एखादी नोटीस सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता आहे. वार्षिक 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या टॅक्सपेअर्सला 31 जुलै नंतर आयटीआर भरल्यास इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. तर वार्षिक 5 लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार.
मुदतवाढीची वाट पाहू नका, रिटर्न फायलिंग लगेच करा
केंद्र सरकारने यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी मुदतवाढ देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कोरोना संकट काळात सलग दोन वर्षे इन्कम टॅक्स फायलिंगसाठी अनेकदा मुदतवाढ देऊन सरकारने करदात्यांना दिलासा दिला होता. त्यामुळे यंदा मुदतवाढीची शक्यता नाही, असे केंद्रीय रेव्हेन्यू सेक्रेटरी तरुण बजाज यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे एक्सटेन्शनची वाट न पाहता टॅक्सपेअर्सने आज आणि उद्यामध्ये रिटर्न फाईल करावा (No Extension for Income Tax Filing), असे सरकारतर्फे आवाहन केलं जात आहे.