भारतासाठी नेदरलॅंड्स आणि ब्राझील हे निर्यातीच्या दृष्टीने मोठे भागीदार बनले आहेत. वर्ष 2022 मध्ये भारताने नेदरलॅंड्स आणि ब्राझीलमध्ये प्रचंड निर्यात केली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार निर्यातीच्या बाबतीत नेदरलॅंड्स भारताचा तिसरा मोठा भागिदार देश बनला आहे. तर निर्यात होणाऱ्या देशांच्या यादीत ब्राझीलने आठवे स्थान पटकावले आहे.
भारताची एकूण निर्यात 12.5% वाढली आहे. तब्बल 263 बिलियन डॉलरचा महसूल निर्यातीतून मिळाला आहे. त्यात तेल आणि त्यासंबधीच्या उत्पादनांचा 70% वाटा आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या काळात निर्यातीच्या बाबतीत ब्राझील 20 व्या स्थानी होते. यंदा ब्राझीलची निर्यात वाढल्याने तो आठव्या स्थानी आला आहे. नेदरलॅंड्स हा तिसरा मोठा देश ठरला आहे.अमेरिका आमि यूएई आहे पहिल्या दोन क्रमांकाचे भारताचे ट्रेड पार्टनर आहेत.
टांझानियाच्या निर्यातीत देखील चालू वर्षात तीन पटीने वाढ झाली आहे. टाझानियाला 2022 मध्ये 2.4 बिलियन डॉलर्सची वस्तूंची निर्यात करण्यात आली. यात 80% वाटा हा पेट्रोल आणि डिझेलचा होता. युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी थेट रशियातून इंधन खरेदी बंद केली आहे. त्याऐवजी भारतातून इंधन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या निर्यातील वाढ झाली आहे.
भारत रशियाकडून क्रूडची आयात करत असून त्यावर प्रक्रिया करुन रिफायनरी प्रोडक्ट्स आफ्रिकन देशांना निर्यात केली जात आहेत. नोव्हेंबर महिन्यातील निर्यातीत 0.6% किंचित वाढ झाली होती. 32 बिलियन डॉलर्सच्या वस्तू आणि सेवांची भारतातून निर्यात करण्यात आली. याच महिन्यात आयात मात्र 5.4% ने वाढली 55.9 बिलियनची आयात झाली असून गेल्या महिन्यात व्यापारी तूट 23.9 बिलियन डॉलर्स इतका होता.