अन्न आणि किराणा (Food & Grocery) सामानाची घरपोच सेवा देणारी देशातली आघाडीची कंपनी स्विगीने (Swiggy India) डिसेंबर महिन्यात 250 कर्मचाऱ्यांना नारळ द्यायचं ठरवलं आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचारी वर्गाच्या 3-5% इतका आहे. त्यामुळे कंपनीच्या आकाराच्या मानाने ही कपात मोठी आहे. इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्राने याविषयीची बातमी दिली आहे.
कंपनीच्या पुरवठा साखळीतले कर्मचारी, टेलिफोन ऑपरेटर, ग्राहक सेवा तसंच तंत्रज्ञ अशा क्षेत्रांमध्ये ही कपात होणार आहे. अलीकडेच स्विगीने त्यांची क्लाऊड किचन कंपनी ‘द बोल कंपनी’चं (The Bowl Company) दिल्लीतलं आऊटलेट बंद केलं होतं. नोव्हेंबर महिन्यात कंपनीचा तोटा आणखी वाढल्यानंतर अखेर त्यांनी पगार कपातीचा निर्णय घेतला आहे.
‘स्विगीला इथून पुढे कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करायचं आहे. त्यासाठी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तंत्रकुशल आणि कार्यक्षम बनवण्यासाठी कंपनीकडून प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी कंपनीने एका व्यवस्थापन कंपनीकडून व्यावसायिक सल्ला घेतला आहे. आणि त्यानंतर कपातीचा निर्णय घेण्यात आला,’ असं स्विगीतल्या अंतर्गत घडामोडींची नीट माहिती असलेल्या एका व्यक्तीने ईटी टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे.
कंपनीने अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी गुणवत्ता तपासणी कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार, त्यांना रेटिंग आणि पदोन्नतीही देण्यात आली. आता या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा कर्मचारी कपातीचा आहे. स्विगीच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने यापूर्वीही कंपनीच्या कामगिरी आणि गुणवत्तेवर आधारित रेटिंग यंत्रणेची माहिती मीडियाला दिली होती.
स्विगीच्या किराणा माल घरपोच पोहोचवणाऱ्या इन्स्टामार्ट (Instamart) सेवेवर तोट्याचं मोठं दडपण आहे. त्यामुळे या सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलवण्याचं कामही सध्या कंपनीने हाती घेतलं आहे. शिवाय इन्स्टामार्टच्या विस्ताराची योजनाही सध्या कंपनीने राखून ठेवली आहे.
अन्न पुरवठा साखळी उद्योगातल्या तज्ज्ञांना नोकर कपातीची ही फक्त सुरुवात असेल असं वाटतंय. थोडक्यात, त्यांनी या क्षेत्रात आणखी नोकर कपातीची शक्यता व्यक्त केली आहे. कारण, स्विगी बरोबरच स्पर्धक कंपनी झोमॅटोनंही मागच्या तिमाहीत तोटा नोंदवला आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये नोकर कपातीची झळ आणखी तीक्ष्ण होईल असा अंदाज आहे.
झोमॅटोच्या तुलनेत स्विगीचा तोटा मोठा आहे. यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान स्विगीला 31 कोटी 50 लाख अमेरिकन डॉलरचा तोटा झाला आहे. याच दरम्यान झोमॅटोला 500 लाख अमेरिकन डॉलरचा तोटा झाला. यात झोमॅटोची किराणा माल घरपोच पोहोचवणारी ब्लिंटकिट सेवेला झालेला तोटाही समाविष्ट आहे.