जगभरात बेरोजगारी ही सध्याची मोठी समस्या आहे. आणि अॅमेझॉन, फेसबुक तसंच ट्विटर यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी अलीकडेच केलेल्या मोठ्या नोकर कपातीनंतर रोजगाराचं चित्र अधिकच धुसर झालं आहे. आणि अशा वातावरणात देशातली अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेत कॅम्पस प्लेसमेंट (IIT Campus Placement) सुरू झाली आहे. एक ते पंधरा डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या रोजगार मेळाव्यात कुठल्या कंपन्यांनी सहभाग घेतलाय आणि यावर्षीचं आयआयटी सर्वाधिक पॅकेज कुणाला मिळालंय जाणून घेऊया. 2023 सालासाठीचा हा पहिलाच मोठा रोजगार मेळावा असल्यामुळे त्यातून आपल्यालाही कळेल की कुठल्या क्षेत्रात आहेत रोजगाराच्या सर्वाधिक संधी?
देशात 23 आयआयटीच्या शाखा आहेत. आणि सगळीकडेच सध्या हा रोजगार मेळावा सुरू आहे. पहिल्या तीन दिवसांचा आढावा घेतला तर यंदा परदेशी कंपन्यांचा प्रतिसाद कमी असला तरी देशी स्टार्ट अप कंपन्या तरुणांना चांगला पगार देऊ करत आहेत. काय आहे कंपन्यांचा रोजगाराविषयीचा मूड?
3 विद्यार्थ्यांना मिळाल्या वार्षिक चार कोटींच्या ऑफर
न्यूयॉर्कमधल्या जेन स्ट्रिट या ट्रेडिंग कंपनीने तिघाजणांना वार्षिक चार कोटी रुपये पगाराची ऑफर दिली आहे. हे तीन विद्यार्थी आयआयटीच्या दिल्ली, मुंबई आणि कानपूर शाखेत माहिती-तंत्रज्ञान विषयात बी-टेकच्या शेवटच्या वर्षाला आहेत. जेन स्ट्रीट शिवाय क्वालकॉम, जे पी मॉर्गन चेझ, ग्रॅव्हिटन, कोव्हेसिटी, एअरबस, मॉर्गन स्टॅनली, मॅकेन्सी या कंपन्याही या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. आणि त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना चांगल्या ऑफर्सही दिल्या. पण, यंदा आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणारं पे पॅकेज गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडं कमी होऊन सरासरी 1.8 कोटी रुपयांचं आहे. तर कित्येक अमेरिकन कंपन्यांनी H1B व्हिसामधील जटील अटींमुळे तरुणांना भारतातच राहून काम करण्याची विनंती केली आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांनी मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात रोजगार आणि जास्त मोबदला देऊ केला आहे.
भारतीय स्टार्टअपमध्ये रोजगाराच्या जास्त संधी
जागतिक रोजगाराच्या संधी कमी होत असताना भारतीय कंपन्या आणि खासकरून स्टार्ट अपनी विद्यार्थ्यांना वार्षिक कोटी - कोटी रुपयांची पॅकेज देऊ केली आहेत. भारतीय कंपन्यांचं सरासरी वार्षिक पॅकेज आहे एक कोटी दहा लाख रुपयांचं. भारतीय कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया, टाटा स्टील, प्रॉक्टर अँड गँबल, शेल इंडिया, बजाज ऑटो या कंपन्यांनी रोजगार मेळाव्यात उत्साहाने भाग घेतला. आयआयटी मद्रासच्या 25 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी प्रत्येकी एक कोटींची ऑफर मिळाली.
कुठल्या क्षेत्रात आहेत रोजगाराच्या संधी?
दरवर्षी आयआयटीतील रोजगार मेळाव्याचा अंदाज घेऊन जगभरात रोजगाराचा काय ट्रेंड आहे याचा अंदाज घेतला जातो. अनेकदा भारतीय कंपन्यांची पे पॅकेजही त्यावरून ठरतात. त्यामुळे इथला ट्रेंड तपासणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं. आयआयटीचा यावर्षीचा कल पाहिला तर माहिती-तंत्रज्ञान, ट्रेडिंग कंपन्या, जागतिक बँका, युएक्स डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर या रोजगार मेळाव्याला प्रतिसाद दिला आहे. देशभरात जवळ जवळ 350 कंपन्या सध्या तरुणांना ऑनबोर्ड घेण्याच्या प्रक्रियेत आहेत.