• 04 Oct, 2022 16:16

India@75 : Demonetization- स्वातंत्र्यानंतर एकदा नव्हे दोनदा अनुभवली भारतीयांनी नोटबंदी!

2016 Demonetisation

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वतंत्र भारताचा विचार करता भारताने एकदा नव्हे तर दोनदा नोटबंदी अनुभवली आहे. नोटबंदी लागू करताना दोन्ही वेळेस सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी मोठ्या रकमेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याची केलेली घोषणा आठवली की, बँकांबाहेर खातेदारांच्या लांबच्या लांब रांग लागल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

जुन्या नोटा बदलताना झालेले त्रास आणि घुसळून निघालेली बँकिंग यंत्रणा यातून नोटबंदीच्या उद्देशावर सवाल उपस्थित केला जातो. कारण रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) आकडेवारीनुसार एक हजार आणि पाचशे रुपयांच्या 99 टक्के जुन्या नोटा या बँकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे खरंच किती काळा पैसा (Black Money) या नोटबंदीमुळे नष्ट झाला हा वादाचा विषय आहे.

नोटबंदीचा इतिहास

2016 Demonetisation
Image Source :  https://bit.ly/3dpu4Ev      

खरंतर याही आधी भारतात दोनदा नोटबंदी (Demonetization) झाली होती. ब्रिटीश सरकारने 1946 साली 1,000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. दुसरी नोटबंदी वर्ष 1978  मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी घोषित केली होती. देसाई यांनी काळा पैसा रोखण्यासाठी मोठ्या रकमेच्या अर्थात 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. धनिकांनी दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मोठ्या चलनी नोटा रद्द केल्या होत्या. त्यामुळे या नोटबंदीचा फारसा परिणाम सामान्य भारतीयांना जाणवला नाही.


वर्ष 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट रद्द करण्याची घोषणा केली. तब्बल 100 दिवस बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरु होती. सहकारी बँका, खासगी आणि सरकारी बँकांनी जुन्या चलनी नोटा स्वीकारल्या. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 99 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत प्राप्त झाल्या. मात्र नोटा बदलून घेण्याच्या प्रक्रियेत उडालेला गोंधळ, बँकांबाहेरील नागरिकांची झालेली चेंगराचेंगरी यामुळे शेकडो नागरिकांचा हकनाक बळी गेला.

75 Banner (1)

Head image source - https://bit.ly/3JNJoar