पैसा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम काय येतं? चलनी नोटा आणि नाणी बरोबर ना. आज आपण कितीही डिजिटल पेमेंटचा वापर करत असलो तरी, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दैनंदिन वापरासाठी आजही नोटा आणि नाण्यांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष नोटांचे महत्त्व आजही तितकंच आहे. दररोज वापरल्या जाणाऱ्या या नोटा तुम्ही कधी निरखून पाहिल्या आहेत का? किंवा असा कधी विचार केला आहे का? की या नोटा कशापासून बनत असतील. तर 100 पैकी किमान 80 टक्के लोक सांगतील की, नोटा तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जातो. पण हे उत्तर चुकीचे आहे. नोटा तयार करण्यासाठी कॉटनचा वापर केला जातो. कागदाचा वापर करून चलनी नोटा तयार केल्या जात नाही, असे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सांगितलं आहे.
फक्त भारतच नाही तर अनेक देश चलनी नोटा तयार करण्यासाठी कॉटनचा वापर करतात. कॉटन पेपर कागदाच्या तुलनेत दीर्घकाळ टिकतो आणि तो वजनाने हलका सुद्धा आहे. कॉटन पेपरमध्ये 75 टक्के कॉटन आणि 25 टक्के लिननचा वापर केला जातो. हा कॉटन पेपर एका विशिष्ट लिक्विडमध्ये ठेवला जातो. जेणेकरून तो अधिक काळ टिकतो.
भारतात नोटा कुठे छापल्या जातात?
भारतात नोटा छापण्याच्या 4 प्रेस आहेत; नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार प्रेसमध्ये नोटा छापल्या जातात. सध्या भारतात 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रूपयांच्या नोटा छापल्या जातात. या नोटा रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या असल्यामुळे यांना बॅंक नोट्स असेही म्हटले जाते. 1 रूपयाची नोट मात्र रिझर्व्ह बॅंक जारी करत नाही. ती सरकारतर्फे छापली व जारी केली जाते. कारण 1 रूपयाची नोट हे मूळ चलन आणि मूल्य आहे. ज्या पद्धतीने आपण एका डॉलरचे मूल्य रूपयामध्ये खाली-वर होताना पाहत असतो. त्याचप्रमाणे आपल्या एका रूपयाचं मूल्यही नोंद होत असतं.
भारतीय नाण्यांवरील ‘ते’ चिन्ह तुम्हाला माहितीये का?
भारतात सध्या मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा या चार ठिकाणी 1, 2, 5, 10 आणि 20 रूपयांची नाणी पाडली जातात. या प्रत्येक नाण्यांवर त्याचं मूल्य आणि नेहमीच्या गोष्टी असतात. पण या व्यतिरिक्त त्यावर आणखी एक चिन्ह असतं. या चिन्हामुळे त्याच्या मूल्यात किंवा वापरण्यात काही विशेष फरक पडत नाही. पण त्या चिन्हावरून तुम्ही हे नाणं कुठल्या टांकसाळीत पाडलं गेलं आहे, हे मात्र नक्की सांगू शकता.
प्रत्येक नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली एक चिन्ह असतं. ते चिन्ह जर डायमंडचं असेल तर ते नाणं मुंबईतलं आहे. तिथे स्टार असेल तर हैदराबाद, टिंब असेल तर नोएडा आणि काहीच नसेल तर ते नाणं कोलकाता इथल्या टांकसाळीत पाडलेलं आहे.
सर्वाधिक मूल्य असलेली नोट?
रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत छापलेल्या नोटांपैकी सर्वाधिक मूल्य असलेली 10,000 रूपयांची नोट ब्रिटिशांनी सर्वप्रथम 1938 मध्ये छापली होती; जी 1946 मध्ये ब्रिटिशांनीच बंद केली. त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आरबीआयने पुन्हा एकदा 1954 मध्ये 10,000 रूपयांची नोट छापली; जी 1978 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काळा बाजार रोखण्यासाठी बंद केली.