स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मर्यादित साधनांमुळे दशकभर भारताची रडतखडत वाटचाल सुरु होती. देशात भूखबळींची संख्या वाढत होती.बंगालमध्ये दुष्काळामुळे जवळपास 40 लाख भूखबळी गेले होते. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्याची घोषणा केली. जागतिक पातळीवरील हरित क्रांतीचे प्रणेते नोरमन बोरलॉग यांच्या प्रेरणेतून कृषी वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीचा रोडमॅप तयार केला. तत्कालीन कृषी आणि अन्न पुरवठा मंत्री बाबू जगजीवन राम यांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आणि वर्ष 1966-67 मध्ये हरित क्रांतीला (Green Revolution) सुरुवात झाली.
Table of contents [Show]
कृषीच्या माध्यमातून देशात ‘हरित क्रांती’ (Green Revolution)
कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगल्या प्रतीचे वाण, रासायनिक खतांचा वापर, भरपूर सिंचन, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर, किटकनाशके आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कृषी केंद्राच्या माध्यमातून स्वतंत्र यंत्रणा सरकारकडून सुरु करण्यात आली. उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात कृषी उत्पादनात वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अशा व्यापक मोहीमेने धान्य उत्पादनात मोठी वाढ दिसून आली. टप्प्याटप्यात धान्य उत्पादन वाढले. विशेष करुन गहू आणि तांदूळ या दोन मुख्य पिकांच्या उत्पादनात अल्पावधीत प्रचंड वृद्धी झाली. वर्ष 1978-79 मध्ये जगाला भारताची दखल घ्यावी लागली. धान्योत्पादनात झालेल्या भरमसाठी वाढीमुळे भारत हा जगातील प्रमुख धान्य उत्पादक देशांच्या यादीत विराजमान झाला.
देशाच्या दरडोई धान्यात वाढ! (Per Capita Grain Increase)
हरित क्रांतीमुळे 30 वर्षांत गव्हाचे उत्पादन तीन पटीने वाढले तर डाळींच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली. त्याशिवाय या मोहीमेत ज्वारी, बाजरी आणि मका या उत्पादनांवर देखील जोर देण्यात आला होता. देशाची भूक भागली अन् भारत स्वयंपूर्ण बनला होता. 1968 ते 1988 हा हरित क्रांतीचा पहिला टप्पा होता. तर 1990 मध्ये दुसरा टप्पा हाती घेण्यात आला. हरित क्रांतीने हेक्टरी उत्पादन वाढले, सिंचनाखालील जमीन वाढली, शेतकरी समृद्ध झाला शिवाय देशाचे दरडोई धान्य प्रमाण देखील बऱ्याच अंशी सुधारले. वर्ष 2005 मध्ये केंद्र सरकारने हरित क्रांती कृषीन्नोत्ती योजना आणली. यात कृषी क्षेत्राशी निगडित 11 योजनांचा समावेश होता.
औद्योगिक क्रांती (Industrial Revolution)
हरित क्रांतीला धरुनच उद्योग क्षेत्रात देखील मोठे फेरबदल घडून आले. कृषी क्षेत्रातील सुधारणांनी शेतीची नवीन तंत्रे विकसित करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, इलेक्ट्रिक मोटार, पंप यासारख्या यंत्रसामुग्रीची एक औद्योगिक परिसंस्था विकसित झाली. त्याशिवाय खते, कीटकनाशके या उद्योगानेही काळानुरुप बाळसे धरले. कृषी संशोधनासाठी नवी विद्यापीठे निर्माण झाली. संशोधन आणि विकासाला चालना मिळाली. केवळ रोजगारापुरता नाही तर या क्षेत्रात त्याकाळी प्रचंड गुंतवणूक झाली ज्याचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला.
धवल क्रांतीने देशात दुधाची गंगा आली! (White Revolution)
केवळ पिकावर अवलंबून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. त्याऐवजी त्यांच्या पशूपालनाला व्यावसायाची जोड दिली तर दूग्ध उत्पादनात वाढ होईलच शिवाय शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळतील या उद्देशाने डॉ. व्हर्गिस कुरियन या कृषि शास्त्रज्ञाने (Dr. Verghese Kurien) 1970 मध्ये 'ऑपरेशन फ्लड' हाती घेतले. त्यांनी नॅशनल डेअरी बोर्डाची स्थापना (Establishment of National Dairy Board) करुन त्यातूनच देशभरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दूध संकलित करुन 700 शहरांमध्ये वितरित केले. यामुळे मध्यस्थ, आडतदार या साखळीतून बाहेर फेकले गेले. शेतकऱ्याला चांगले पैसे आणि पर्यायाने ग्राहकाला वाजवी दरात दूध मिळू लागले. या मोहिमेला युरोपीय इकॉनॉमिक समुदायाकडून सहाय्य मिळाले. यात पहिल्या टप्प्यात 18 दूध संघ सुरु करण्यात आले. 1985 पर्यंत दुसऱ्या टप्प्यात देशभरात 43000 दूध संघ कार्यरत झाले. दूध सहकारी चळवळ पुढे देशभरात पसरली. 22 राज्यांमध्ये 180 हून अधिक जिल्ह्यात 1,25,000 खेड्यांमध्ये दूधाची गंगा पोहोचली.
देशात डेअरी उद्योगाचा झपाट्याने विकास झाला होता. केवळ दूधच नाही तर दूध पावडर, लोणी आणि इतर दूग्धजन्य पदार्थांमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला होता. धवलक्रांतीने (White Revolution) देशाच्या दूध उत्पादनात तब्बल चार पटीने वाढ झाली. 1998 मध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करुन भीम पराक्रम केला. 30 वर्षात दरडोई दुध उपलब्धता दुप्पट झाली.
संगणकीय क्रांती (Computer Revolution)
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताचे फादर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड टेलिकॉम क्रांतीचे जनक (Former PM Rajeev Gandhi, Father of Information Technology & Telecom) म्हणून ओळखले जातात. मॉर्डन इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या राजीव गांधी यांनी भारताला संगणक वापरण्यास प्रोत्साहन दिले. पंतप्रधानांचे तत्कालीन सल्लागार सॅम पित्रोदा यांनी टेलिकम्युनिकेशनसह सहा महत्त्वाच्या क्षेत्राच्या वृद्धीसाठी विशेष मोहिमा राबवल्या. भारतीय रेल्वेचे संगणकीकरण राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झाले. माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, विमान या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गांधी यांनी कर सवलती, आयातीमधील अडथळे दूर केले. या उद्योगाला वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले.
डिजिटल इंडियाचा पाया राजीव गांधी यांनी 90 च्या दशकात घातला. त्यांनी ऑगस्ट 1984 मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT)या संस्थेची स्थापना केली. देशभरात त्यानंतर पी.सीओ (Public Call Office) या दूरध्वनी सेवेनं लोकांना जोडले. पुढे महानगरांमध्ये टेलिकॉम नेटवर्क उभारणीसाठी एम.टी.एन.एलची (MTNL) मुहूर्तमेढ रोवली गेली.
डिजिटल इंडिया (Digital India)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आणि समाजाला सक्षम करण्याच्या उद्देशाने 1 जुलै, 2015 रोजी डिजिटल इंडिया (Digital India) हा कार्यक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून देशातील दुर्गम खेड्यात राहणार्या मुला-मुलीपर्यंत चांगले शिक्षण पोहचू लागले. आज प्रत्येक भारतीय जनधन योजनेद्वारे मोबाईलवरून बँक खाते वापरू शकतो. युपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटचा वापर वाढला. शेतीमध्ये ड्रोनचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढवली. रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून इंडस्ट्री, मेडिकलमध्ये नवीन सोयीसुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होऊ लागल्या.
अशाप्रकारे भारताने गेल्या 75 वर्षांत वेगवेगळ्या टप्प्यावर ‘क्रांति पर्व’ निर्माण केलं आणि भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज आपण प्रगतीशील 75 वे स्वातंत्र्य वर्ष साजरं करत असताना या ‘क्रांति पर्वां’चा धांडोळा घेणं क्रमप्राप्त आहे.