Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Return : करदात्यांसाठी अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे काय?

Income Tax Return : करदात्यांसाठी अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट म्हणजे काय?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (Annual Information Statement-AIS) हे पॅनकार्ड क्रमांकावर आधारित करदात्याशी संबंधित विविध स्त्रोतांद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणारं विवरण (Statement) आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयटीआर रिटर्न (ITR Return) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2022 आहे. त्यामुळे ऑनलाईन आयटीआर (ITR e-filing) भरणाऱ्या करदात्यांनी इन्कम टॅक्स विभागाने रिटर्न फाईल करण्याच्या पद्धतीत काही बदल केले आहेत. ते तापसून घेणं गरजेचं आहे. जसे की, विभागाने अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) उपलब्ध करून दिले आहे. या स्टेटमेंटमध्ये करदात्याचे सर्व आर्थिक व्यवहारांचे विवरण देण्यात आले आहे.


अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (Annual Information Statement-AIS) हे दुसरे-तिसरे काही नसून विविध संस्था/स्त्रोतांद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांचे स्टेटमेंट AIS आहे. जे करदाताच्या पॅनकार्डवर आधारित इन्कम टॅक्स विभागाने एकत्रित करून दिलेले स्टेमेंट आहे. AIS स्टेटमेंटद्वारे दिली जाणारी माहिती यापूर्वी इन्कम टॅक्स विभाग फॉर्म 26AS द्वारे देत होता. या फॉर्ममध्ये एखाद्यात्या उत्पन्नातून कपात केलेला किंवा संकलित केलेल्या टॅक्सचे तपशील, तसेच करदात्याने थेट भरलेल्या टॅक्सचे तपशील दिले जात होते. याचबरोबर 26AS फॉर्ममध्ये टॅक्सच्या परताव्याच्या तपशीलासह त्या परताव्यावर किती व्याज मिळाले, याची माहिती दिलेली असते. आता AIS च्या निर्मितीनंतर, इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांसाठी उपलब्ध असलेल्या तपशीलांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या स्टेटमेंटमुळे करदात्याला त्याचा ITR अचूकपणे भरण्यास मदत होणार आहे.

अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये नेमकं काय आहे?

अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये सर्व व्यवहारांचे तपशील देण्यात आलेत. जे वर्षभरात विशिष्ट संस्थांद्वारे केलेले आहेत आणि त्याची माहिती इन्कम टॅक्स विभागाला देणं आवश्यक आहे. विशिष्ट संस्थांमध्ये बॅंका (Bank), रजिस्ट्रेशन ऑफिसेस, स्थानिक ट्रान्सपोर्ट ऑफिसेस, परकीय चलनांचा व्यवहार करणारे अधिकृत डीलर, स्टॉक एक्स्चेंज, म्युच्युअल फंड, शेअर्स यांचा समावेश होतो. यामुळे करदात्याच्या पॅनकार्डशी (Pan Card) संबंधित सर्व व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असणार आहे. यातून काहीही सुटू शकणार नाही. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना करदात्याने अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटचा (AIS) वापर करून सर्व व्यवहारांची नोंद करावी. अन्यथा इन्कम टॅक्स विभागाकडून आलेल्या नोटीशीचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. या स्टेटमेंटमध्ये क्रेडिट कार्ड, शेअर मार्केट (Share Market), म्युच्युअल फंड (Mutual Fund), डिबेंचर आणि बॉण्ड्सशी संबंधित व्यवहारांची माहितीही असते.

रिटर्न फाईल करण्यासाठी AIS फायद्याचे ठरते

इन्कम टॅक्स विभागाने करदात्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यासाठी अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) तयार केले आहे. या स्टेटमेंटच्या आधारे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील गोळा करण्यास मदत होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात अधिक रकमेचे आर्थिक व्यवहार किंवा खर्च झाला असल्यास तो तुम्ही फॉर्म 26AS द्वारे पडताळून पाहू शकता. फॉर्म 26AS च्या भाग E मध्ये मोठ्या व्यवहारांचा एकत्रित तपशील दिलेला असतो. त्यामुळे रिटर्न फाईल करताना अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील माहिती गांभीर्याने घेऊन त्याचा उल्लेख रिटर्न फाईल करताना केला पाहिजे. 

AIS आणि फॉर्म 26AS मध्ये विसंगती आढळल्यास

जर एखाद्या करदात्याच्या अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये अशा व्यवहारांची नोंद झाली असेल, जे व्यवहार करदात्याने केलेले नाहीत. अशावेळी करदाता ही चूक इन्कम टॅक्स विभागाच्या ऑनलाईन तक्रार सुविधेमार्फत लक्षात आणून देऊन त्यात सुधारणा करून घेऊ शकतो. पण अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिलेली माहिती योग्य असेल आणि तुम्ही त्याची रिटर्न फाईल करताना नोंद घेतली नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.