Tata Nano: आज जर मी तुम्हाला विचारलं की, जगातली सर्वात स्वस्त कार कोणती? तर कोणीही न चुकता 'टाटा नॅनो(Tata Nano)' कारचं नाव नक्की घ्याल. भारतातील प्रतिष्ठित आणि नावलैकिक असलेले टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटांना(Ratan Tata) ही गाडी अतिशय प्रिय आहे. या गाडीसोबत त्यांचं एक वेगळंच नातं आहे. यंदाच्या Auto Expo 2023 मध्ये टाटांच्या इलेक्ट्रिक नॅनो कारची झलक पाहायला मिळेल असं बोललं जात होतं मात्र ती केवळ चर्चाच होती.
नॅनोमधून टाटांची झालेली सुपरहिट एन्ट्री
नॅनोला लोकांची पसंती मिळाली नसली तरीही रतन टाटांसाठी ही गाडी अतिशय जवळची आहे. ही घटना साधारण २०२२ मधील आहे. रतन टाटा त्यांच्या कामानिमित्त ताज हॉटेलमध्ये मिटिंगसाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाच्या नॅनो कारमधून घेतलेल्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
विनम्र स्वभाव आणि साधी राहणी असणाऱ्या रतन टाटांना नॅनो किती जवळची आहे हे त्यावरून कळाले. अब्जाधीश असणाऱ्या रतन टाटांच्या कारच्या ताफ्यात मर्सिडीज बेंझ इ क्लास (Mercedes-Benz E-Class), ब्यूक्स स्कायलार्क(Buick Skylark), फेरारी कॅलिफोर्निया(Ferrari California), जॅग्वार एफ टाईप एस(Jaguar F-Type S), मर्सिडिज बेंझ एमआर(Mercedes - Benz MR), लॅण्डरोव्हर फ्रीलँडर(Land Rover Freelander) यासारख्या एकाहून एक कार समाविष्ट आहेत. पण त्यामध्येही मोठ्या थाटात आणि दिमाखात नॅनो(Nano) स्वतःची एक वेगवेगळी जागा तयार करून उभी आहे.
नॅनोच्या जन्माची गोष्ट
एकदा रतन टाटा गाडीतून जात असताना त्यांनी स्कुटरवर जाणाऱ्या एका परिवाराला पाहिले. छोट्या स्कुटरवर पती, पत्नी आणि त्यांची दोन मुलं प्रवास करत होती. हा प्रसंग हेरून टाटांनी सर्वसामान्य माणसाला सुरक्षित रस्त्यावरून प्रवास करता यायला हवा म्हणून 'नॅनो(Nano)' जन्माला घातली. नॅनोच्या जन्माची ही गोष्ट स्वतः रतन टाटांनी इंस्टाग्राम वरून शेअर केली. प्रत्येकाला कारमधून फिरता यायला हवे असे स्वप्न दाखवणारे टाटा हे पहिलेच व्यक्ती असावेत. अवघ्या एक लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच केलेली ही कार जगात क्रांती करेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. भारतीय ग्राहकांनी सुरुवातीला या कारचं स्वागतही केलं, मात्र पुढे या कारला फारशी मागणी न मिळाल्याने कंपनीने या कारचं उत्पादन बंद केलं. सर्वसामान्य माणसाच्या दारात चारचाकी उभं करण्याचं श्रेय रतन टाटांना नॅनोच्या रूपात द्यायला काहीच हरकत नाही.